apmc-chairman-election-akola: अकोला कृउबास सभापती उपसभापती निवडणूक: सहकार पॅनलची सत्ता कायम ;शिरीष धोत्रे चौथ्यांदा अविरोध सभापती



भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती. आजच्या सभापती उप सभापतीच्या निवडणुकीत शिरीष धोत्रे हे बिन विरोध निवडून आले आहे. तर ज्ञानेश्वर महल्ले यांची उप सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.




अकोला बाजार समितीमध्ये गेल्या 40 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या सहकार पॅनलचे 15 उमेदवार निवडून आले असून, सहकार पॅनलची सत्ता कायम आहे. या सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र होते हे विशेष. 




कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  पार पडलेल्या निवडणुकीत अकोला बाजार समितीवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता आली. आज गुरुवार, 18, मे रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी शिरीष धोत्रे तर उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर महल्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.


मुंबई व विदर्भातील शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक पार पडली असून, सहकार क्षेत्राने चार दशकांची परंपरा कायम ठेवत एकहाती सत्ता आणली आहे.




निवडणुकीत सहकार क्षेत्राला रोखण्यासाठी वंचित आघाडीने सरपंच संघटना व शिव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून व्यूहरचना रचत सहकार विरोधात पॅनल उभे होते. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र येवून या सहकार पॅनलने निवडणुकीत वंचित आघाडीचा धुव्वा उडवून एकहाती सत्ता कायम ठेवली. बाजार समिती निवडणूक पक्षावर लढवीत नसले तरी राजकीय पक्ष पुरस्कृत उमेदवार या निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेले 11 संचालक, भाजपचे 5 आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) 2 उमेदवार विजयी झाले.


बाजार समितीवर गेल्या 40 वर्षांपासून सहकार पॅनल धोत्रे गटाचे वर्चस्व प्रस्थापित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री वसंतराव धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे सहकार पॅनलला तालुक्यातील मतदारांनी नेहमीच पसंती दिली.




सन 2008 च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिरीष धोत्रे यांची सभापतीपदी निवड झाली होती. यंदाही पूर्ण बहुमत असल्याने धोत्रे यांच्या गळ्यात पुन्हा सभापती पदाची माळ पडली.






शिरीष धोत्रे हे चौथ्यांदा अविरोध सभापती म्हणून निवडून आले आहे.यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांचे सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या