good-friday-2023-akola-dist: भगवान येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या घटनेचा सजीव देखाव्याने पाणावले डोळे…अनेकांनी अश्रूंना करुन दिली मोकळी वाट…




ठळक मुद्दे 

*प्रीति, माणुसकी हरपत चालली              - पास्टर अनिल निकाळजे यांचे प्रतिपादन


*अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ख्रिस्ती बांधवांनी भगवान येशू ख्रिसतांना सुळावर चढवलं तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे 7 एप्रिल रोजी साजरा केला. अकोला शहरातील माऊंट कारमेल चर्चमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भगवान येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या घटनेचा देखावा यावेळी तयार करण्यात आला. यावेळी ज्या प्रमाणे येशू ख्रिस्त 14 टप्प्यातून यातना सहन करून गेले असे 14 टप्पेही तयार करण्यात आले होते.14 व्या टप्प्यात प्रभू येशू यांच्या पार्थिवाला एका गुफेत ठेवण्यात आले. असा हा सजीव देखावा उभा करण्यात आला होता. हे दृश्य पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.तर अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. काहींच्या डोळ्यातील अश्रू   थांबता थांबत नव्हते … या कार्यक्रमाला अकोल्यातील ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. 





विशेष प्रार्थना सभा 


सध्याच्या काळात प्रीति, स्नेहभाव, माणुसकी हरपत चालली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील बायबलचे अभ्यासक पास्टर अनिल निकाळजे यांनी केले. 



अकोला शहरासह संपूर्ण जिल्हयात गुडफ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवारचा सण 7 एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मिय बंधू भगिनींनी मोठया भक्तीभावाने साजरा केला. गुड फ्रायडे निमित्त खदान ख्रिश्चन कॉलोनी येथील बेथेल सेव्हीअर्स अलायन्स चर्च मध्ये आयोजित विशेष प्रार्थना सभेत पास्टर निकाळजे बोलत होते.     





                                                      अकोला शहरातील आठ चर्चेससह जिल्हयातील सुमारे तीस चर्चेसमधून गुड फ्रायडे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दरम्यान, प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरूत्थानानिमित्त जगभरात उद्या, रविवारी ख्रिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत. 




प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवाच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्हयातील चर्चेसमधून बायबलच्या अभ्यासकांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांचा आधार घेत प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या घटनेवर प्रकाश टाकला. दरवर्षी प्रत्येक चर्चमधून प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत असताना उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलचे अभ्यासक, प्रमुख वक्ते, चर्चचे धर्मगुरू आणि चर्चमधील वडीलधारी मंडळी बायबलच्या वचनांच्या आधारे भाष्य करीत असतात. पास्टर निकाळजे यांनी गुडफ्रायडेचे महत्व विषद करताना बायबल मधील वचने आणि विविध उदाहरणे सांगितली. 




यावेळी गुडफ्रायडेनिमित्त जस्टीन मेश्रामकर, अमित ठाकूर, डॉ शीतल ठाकूर, राजेश ठाकूर, फिलमोन ठाकूर, एस्तेरबाई तसेच महिला संघाने विविध गीतेही सादर केली.  





पास्टर निकाळजे यांनी प्रीति, स्नेहभाव, बंधुभाव, माणुसकी यावर भाष्य करताना यासंदर्भात प्रभू येशूच्या कार्याची उदाहरणे दिली. माणूस चंद्रावर गेला परंतु शेजारधर्म विसरला असेही त्यांनी सांगितले. बायबल मध्ये सांगितल्यानुसार आपल्या आई वडिलांचा मान राखावा, दहा आज्ञाचे पालन करावे असेही सांगितले. 




गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांचा लेन्थचा पवित्र महिना सुरू होता. या काळात ख्रिश्चन बंधू भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात, घरोघरी कॉटेज प्रेअरचे आयोजन केले जाते.



दरम्यान, उद्या अर्थात रविवारी प्रभू येशूंच्या पुनरूत्थानानिमित्त दरवर्षी ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात सकाळी 6 वाजता प्रात:कालीन प्रार्थना आणि सकाळी 9 वाजता दिंडी आयोजित करण्यात आली आहे.  बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चचे रेव्हरंड निलेश अघमकर यांनी संचालन केले.


टिप्पण्या