Akola crime: अंध महिलेवर अत्याचार ; पीडितेच्या पतीला मारहाण, सिसीटिव्ही फुटेज आधारे आरोपी जेरबंद






भारतीय अलंकार 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: माणुसकीला काळिमा फासणारी घटना अकोल्यात घडली. एका अंध महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. अकोला पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेज आधाराने शोध घेऊन या घटनेचा छडा अवघा काही तासातच लावून आरोपीस जेरबंद केले आहे. 




दिव्यांग अंध पती-पत्नी शुक्रवारी अकोला बस स्थानकावर आपल्या मुलीच्या भेटीसाठी गावाला जाण्यासाठी उतरले मात्र त्यांना बस न भेटल्याने ते चिंतीत झाले. अशातच त्यांना आरोपीने प्रायव्हेट बस असल्याचे सांगितले आणि शहरातील टॉवर चौकात नेले इतक्यात महिलेला फोन आला आणि गावी येऊ नका अस सांगितले. गावी परत जाण्यासाठीही गाडी नसल्याने रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याच निर्णय या दिव्यांग पती पत्नीने घेतला. यानंतर आरोपीने त्यांना रेल्वे स्टेशनला सोडून देतो सांगत ऑटोत बसवून एका निर्जीव स्थळी नेले. निर्जीव स्थळी दिव्यांग पतीला आरोपीने मारहाण केली आणि महिलेवर लैंगिक अत्याचार केले. दिव्यांग दाम्पत्याने शहरातील सिव्हिल लाईन पोलिसात तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली असल्याचे भाऊराव घुगे (पोलीस निरीक्षक , सिव्हिल लाईन) यांनी सांगितले.





या घटनेची हकीकत अशी की, नवीन बसस्थानकात आलेल्या अंध पती-पत्नीला एका नराधम युवकाने अज्ञात स्थळी नेऊन पतीच्या समोर 34 वर्षीय अंध महिलेवर सतत तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची घटना 31 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी 5 एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलिस पथकांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे.




34 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 31 मार्च रोजी पतीसह ती बसगाडीने अचलपूर येथून अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे जाण्यासाठी बसस्थानकात आली होती. यावेळी दोघेही पती-पत्नी अंध असल्याचा फायदा घेऊन जुने शहरातील मरगट येथील रहिवासी आरोपीने दोघाही पती- पत्नीला रेल्वे लोहमार्ग असलेल्या अज्ञात ठिकाणी नेले आणि या ठिकाणी नराधम युवकाने दोघाही पती- पत्नीच्या अंधपणाचा व असहायतेचा फायदा घेऊन अंध महिलेवर बळजबरी अत्याचार केला. एवढेच नाही तर आरोपीने सतत तीन वेळा महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी या दोघांनाही सोडून पसार झाला. 5 एप्रिल रोजी रात्री महिलेने पतीसह सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीस तातडीने अटक करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा, सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन, रामदासपेठ पोलिस स्टेशन यांना दिले.




अंध महिलेवर अत्याचाराची घटना समोर येताच, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते.





स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महाले यांच्यासह त्यांच्या टीमने व सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तातडीने पावले उचलून नवीन बसस्थानकाती सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि अवघ्या काही तासांतच आरोपीला जेरबंद केले.



पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने पावले उचलत संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महाले यांच्यासह एपीआय महेश गावंडे व त्यांच्या टीमने, तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे, एपीआय पंकज कांबळे, रामदासपेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे यांनी तातडीने शहरात आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नराधम आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याला सिव्हिल लाइन पोलिसांच्या ताब्यात दिले.

टिप्पण्या