bkv SSC 1970 batch reunite: भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या एसएससी 1970 बॅचच्या विद्यार्थ्यांची 53 वर्षांनंतर पुनर्भेट!






भारतीय अलंकार 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर अकोला येथील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या एसएससी  - 1970 बॅच, इंग्रजी मिडियमच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेह संमेलनाला या बॅचचे विद्यार्थी व त्यांचे जोडीदार असे एकूण 36 जण उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे ह्यातील बहुतेक विद्यार्थ्यांची एकमेकांशी 1970 नंतर म्हणजे तब्बल 53 वर्षांनंतर भेट झाली. 





मित्रांची भेट घेण्याच्या ओढीने रमाकांत साधनकर हा विद्यार्थी स्वतः स्थायिक झालेल्या देशातून म्हणजे कॅनडातून खास स्नेहसंमेलनासाठी अकोल्यात आला. इतर विद्यार्थी अहमदाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, हिंगणघाट, नागपूर, वर्धा वगैरे ठिकाणांहून आलीत.




12 फेब्रुवारीला सकाळी एका मित्राकडे नाश्ता आटोपल्यावर, सर्वजण भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या भाऊसाहेब गोडबोले सभागृहात जमा झालेत. तेथे  विद्यार्थ्यांचे शिक्षक, श्री शंकर राघवन सर व  प्रा.श्री वसंतराव लोखंडे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व नंतर सरस्वती स्तवन व वंदेमातरम गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. शिक्षकांच्या परिचयानंतर सर्वांनी जोडीदारासोबत मंचावर येऊन स्वतःचा परिचय करून दिला. 





शाळेच्या संस्कारांमुळे विद्यार्थी स्वकर्तुत्वाने डॉक्टर्स, ईंजिनिअर्स, प्राध्यापक, उच्चपदस्थ बँकर्स, सरकारी अधिकारी व यशस्वी व्यापारी झालेत व त्यांची मुले मुली सुद्धा आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन डॉक्टर्स, ईंजिनिअर्स, कन्सल्टंट, सैन्यात अधिकारी व यशस्वी व्यापारी झाले आहेत, तर काहींची मुले मुली परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.



तदनंतर सर्वांनी जोडीदारांसह दोन्ही सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सत्कार केला. दोन्ही सरांनी  उपस्थितांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिवनात केलेल्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांचे मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना स्वतःच्या 1968-69 व्या वर्षी सुद्धा प्रेरक होते. आभारप्रदर्शनात, शाळेचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, संचालक व उपस्थित सरांचे आभार मानण्यात आलेत. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत मित्र व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 





यानंतर सर्वजण एका मित्राच्या फार्महाऊस वर जमलेत. तेथे जेवण आटोपल्यावर सर्वांना, खास स्नेहसंमेलनानिमित्ताने व्यक्तिगत नावासह तयार करवून घेतलेली स्मृतिचिन्हे देण्यात आलीत. तसेच पुरुषांना शेले व स्त्रियांना आकर्षक पर्सच्या भेटी देण्यात आल्यात.नंतर विद्यार्थी व शिक्षकांनी गाणी, कविता, मनोगत, विनोदी चुटके सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.



संध्याकाळ होत आल्याने सर्वांनी पुन्हा असेच भेटण्याची तीव्र ईच्छा व्यक्त करून स्नेहसंमेलनाची सांगता केली. आपआपल्या घरासाठीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी दोन विद्यार्थीनींनी सर्वांना घरी आमंत्रित करून उपस्थित स्त्रियांना भेटवस्तू दिल्यात व जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. असे आगळेवेगळे स्नेहसंमेलन सर्व सहभागींच्या स्मरणात चिरकाल राहील ह्यात शंका नाही, अश्या भावना सर्व विद्यार्थी मित्रांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पिसोळकर यांनी केले. आभार डॉ. दिगंबर देशमुख यांनी मानले.





या संमेलनात डॉ. अरुण बक्षी, अशोक हेडा, अशोक पालडीवाल, गंगाधर इंगळे, किशोर काशीकर, लक्ष्मीनारायण ठाकुर, नामदेव ठाकरे, राजेंद्र पाटील, संजय जगताप, सुभाष गणोजे, विजय गडेकर हे सहपत्नी आले होते. तसेच अलकनंदा कुळकर्णी, माणिक कुळकर्णी, पुरुषोत्तम चुटके, रमाकांत साधनकर, आर.जी.देशमुख, रामकृष्ण मुठाळ, रवि कोरान्ने, डॉ. शाम कहाते, सुभाष देशमुख व विनायक देशमुख हे देखील उपस्थित होते.   



टिप्पण्या