road accident-vinayak mete-mumbai: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

 



भारतीय अलंकार 24

मुंबई, दि.१४: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. 


अपघातानंतर जवळपास तासभर मेटे यांना  मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात  दाखल करण्यात आले. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाल्याचे  रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.


मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला.  अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरु होते. मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे यावेळी त्यांच्यासोबत होते.  


विनायक मेटे यांचा राजकिय प्रवास 

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. अलीकडे मराठा आरक्षणासाठी त्यांनी लढा दिला.मराठा आरक्षण आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मेटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे मुळ रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार राहिले. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य राहीले.

टिप्पण्या