rain update-Akola City - rainy days: महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर: नाल्याचे पाणी घरात; परिसराला नदी तलावाचे रुप, कागदी जहाज पाण्यात सोडून वांचितचे आंदोलन



भारतीय अलंकार 24

अकोला : गेल्या आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे अकोला शहरातील नाल्यांची साफसफाई नसल्याने त्या तुडुंब भरल्या. या नाल्यांमधुन रस्त्यांवर एक ते दोन फुट पाणी साचल्याने सोमवारी (दि.१८) वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कागदी जहाज सोडून आंदोलन करण्यात आले. 


अकोला शहरातील उमरी परिसरातील ढोके पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर नालीतील पाणी एक ते दीड फुट साचल्याने या रस्त्याला तलावाचे स्वरुप आले होते. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ५ मधील ताथोड नगरातील ६० ते ७० नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान झाले आहे. यासह अकोला शहरातील गुढधी,  खदान परिसर, जेतवन नगर, कवाडे नगर, महात्मा फुले नगर, कैलास टेकडी, सिंधी कँम्प, अकोली, सिध्दार्थवाडी, यशवंत नगर, पंचशिल नगर, कमला नगर, रमाबाई नगर, हरीहरपेठ, डाबकी, भौरद, गजानन नगर, गुलजारपूरा, गडंकी, अकोंटफैल परीसर, नायगांव आदी भागातील नाल्यांची साफसफाई नसल्याने नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यामध्ये जीवनाश्यक वस्तुंसह मोठे नुकसान झाले आहे. या सर्व भागांची पाहणी करित उमरी रस्त्यावर साचलेल्या एक ते दोन फुट पाण्यात कागदी जहाज सोडुन वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष तथा जि.प.सदस्य शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले.



शहरात झालेल्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर करुन पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष शंकराराव इंगळे, माजी गटनेते गजानन गवई, मनोहर बनसोड, विजय नरवाडे, अमोल कलोरे, अवधुत खडसे, नितेश किर्तक, सरोज वाकोडे, सुरेश कलोरे, सरला मेश्राम, सम्यक वाकोडे, प्रेमकुमार वानखडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



नाल्यांमधील घाण पाणी नागरिकांच्या घरात


महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे अकोला शहरातील विविध भागात संततधार पावसामुळे नाल्यांमधील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन मनपा प्रशासनाने पुरग्रस्त भागाची पाहणी करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि उपाययोजना करण्याच्या सुचना झोन अधिकाऱ्यांना द्याव्या.

- शंकरराव इंगळे (महानगराध्यक्ष तथा जि.प.सदस्य) 



या भागात झाले नुकसान


१) प्रभाग क्रमांक ५ मधील ६० ते ७० नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

२) प्रभाग क्रमांक ६ मंदिर गुडधी गावातील दलित वस्तीत पिडीकेव्हीने नाला केल्यामुळे ४० ते ५० नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

३) प्रभाग क्र. ४ मधील न्यू तापडिया नगर, खरप पंचशील नगर दुबे वाडी दमानी, क्रांती चौक रस्त्यावरील नालीवरील अरुंद पूलामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला. 

४) शहरातील विविध भागातील नागरिकांच्या घरामध्ये एक ते दीड फूट पाणी घुसून बोरिंग मशीन, मोटरसायकल, वाहने, जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



नायगाव परिसरात नागरिकांच्या घरात पाणी; रेल्वे पुलाखाली फसली वाहने 



पावसामुळे अकोला शहरातील अनेक भागात पाणी साचलं. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये येणाऱ्या नायगाव परिसरातील नागरिकांना मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.शहरातून नायगाव मध्ये जाणाऱ्या एकमात्र रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी साठल्याने या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे पुलाखाली पाण्यामुळे अनेक वाहने फसत आहे. तर गाड्या बंद सुद्धा होत आहे. परिसरातील नागरिक पाण्यामध्ये फसलेल्या वाहनांना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे.याच भागात अकोला महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड सुद्धा आहे. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात येथून ये-जा करतात या गाड्या सुद्धा या पाण्यात फसत असून वाहतूक खोळंबली.


बापू नगर, हाजी नगर, आझाद कॉलनी, समता नगर, रेणुका नगर, आयोध्या नगर, मेहरे नगर, जाजू नगर, गोकर्ण नगर,अंबिका नगर आदी भागात लोकांच्या घरात पाणी शिरले. 



एमरॉल्ड कॉलनीत पाणी 



अकोला जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अकोला शहरातील एमरॉल्ड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले आहे.या कॉलनीतील एमरॉल्ड शाळा आणि नागरिकांच्या घरात मोठया प्रमाणात पुराचे पाणी शिरले असून, आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुध्दा ढग फुटी सदृश परिस्थिति निर्माण झाली होती, त्यावेळी सुध्दा या भागाला पुराचा फटका बसला होता. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरत आहे.





Latest update 

वान प्रकल्प

आज दि. १८/०७/२०२२ रोजी  रात्री १०:१५  वाजता वान  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग  ६४.८५ घ.मी./से. वरून वाढवून १२८.३०  घ.मी./से.एवढा करण्यात येत आहे. प्रकल्पाचे  ४ वक्रद्वारे प्रत्येकी ५० सेंमी व २ वक्रद्वारे प्रत्येकी ३० सेमी  उंचीने उघडुन  नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे. 


वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


टिप्पण्या