Political maharashtra: BJP-NCP: आमदार मिटकरी यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र; घाईघाईतली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे अन् १२ आमदारांची प्रलंबीत यादी…





भारतीय अलंकार 24

अकोला,दि.७: राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना संविधानाच्या प्रतीसह एक खरमरीत पत्र भेट दिले. या पत्रात राज्यपालांच्या दुटप्पी भूमिकेवर मिटकरी यांनी  टीका केली आहे. घाईघाईत बेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबीत यादी…याचा या पत्रात उल्लेख केलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  अकोल्याच्या दौ-यावर आले होते.


 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून राज्यपाल कोश्यारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दीक्षांत समारंभातच राज्यपालांना संविधानाच्या प्रतीसह एक पत्र दिले .या पत्रात आमदार मिटकरी यांनी राज्यपालांना शाब्दिक फटकारे मारले आहेत.

कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून ३६ व्या दीक्षांत समारंभास आपण स्वत: हजर राहत असल्याने कृषी विद्यापीठ सदस्य म्हणून 'भारतीय संविधानाची' प्रत देवून सन्मानित करतांना आनंद होतो आहे. कारण देशातील लोकशाहीची समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मुल्ये याच संविधानात आहेत. असे या पत्रात नमूद केले आहे.

पी.सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. व संविधानप्रेमी असाल याबाबत तरी आशादायी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्य वागलात, असे मत विविध घटनातंज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत बेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबीत यादी. यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येतं असली तरीही आपण संविधानाचा नेहमीच सन्मान करत असाल, याबाबत शंका नाही. आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासा‌ठी अभिमानाचा क्षण होता.

छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आला. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चीतच करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देतांना आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! संविधानाचे जतन करण्यासाठी कायम कटीबद्ध रहाल,असेही या पत्रात शेवटी म्हंटले आहे . या पत्राची कार्यक्रम स्थळी चर्चा झाली.

टिप्पण्या