Consumer forum: अस्थीरोग संदर्भात कुठलीही पदवी नसतांना रुग्णावर धोकादायक उपचार करणाऱ्या डॉक्टरला ग्राहक मंचाचा दणका; रूग्णाला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.4: वैद्यकिय सेवेत हलगर्जी, न्युनता व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत डॉक्टरने रूग्णाला झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रुपये अदा करावे,असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने पारित केला आहे. न्यायमंचाच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी, उदयकुमार सोनवणे यांनी हा आदेश दिला आहे. या डॉक्टर कडे अस्थीरोग संदर्भात कुठलीही पदवी,प्रमाणपत्र नसतांना देखील त्यांनी रुग्णावर धोकादायक उपचार केल्याचे या प्रकरणात समोर आले, हे येथे उल्लेखनीय आहे.  


जळगाव जिल्ह्यातील कल्पना माधवराव गवांदे ही 52 वर्षीय गुडघेदुखीचा त्रास असणारी महिला तेल्हारा येथील डॉ द्वारकादास नारायण राठी यांच्या हॉस्पिटल मध्ये गुडघेदुखीच्या उपचारासाठी आली असता, डॉ. राठी यांनी चुकीचा उपचार करून गुडघ्यात इंजेक्शन टोचून गुडघ्यात सेप्टिक शॉक निर्माण केला. डॉ राठी यांच्या अशा चुकीच्या उपचारामुळे या महिलेस वेदना होऊ लागल्या. नंतर गवांदे यांनी जळगावचे डॉ. अनिल खडके यांच्याकडे उपचार सुरू केला. या उपचारात डॉ खडके यांना डॉ राठी यांनी उपचार केलेल्या गुडघ्यात सेप्टिक शॉक निर्माण झाला असल्याचे आढळून शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचा अभिप्राय गवांदे यांना दिला.


22 सप्टेंबर 2018 रोजी जळगाव येथील डॉ. खडके यांच्या हॉस्पिटलमध्ये या महिला रुग्णाची गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यात नाहक या महिला रुग्णास चार लाख रुपयांचा खर्च आला. हे सर्व डॉ राठी यांचा हलगर्जीपणा, सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचारामुळे होऊन यात अनाठायी खर्च ऑपरेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे  गवांदे यांच्या निदर्शनात आले.  


चुकीच्या पद्धतीने उपचार करणाऱ्या डॉ. द्वारकादास नारायण राठी यांच्या विरोधात कल्पना गवांदे यांनी अकोला येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात क्षतीपूर्तीसाठी तक्रार दाखल केली.

ग्राहक न्यायमंचाने या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून वैद्यकीय अहवाल मागितला. या अहवालात डॉ. राठी कडे अस्थीरोग संदर्भात कुठलीही पदवी,प्रमाणपत्र नसतांना देखील त्यांनी रुग्ण गवांदे यांच्यावर धोकादायक उपचार केल्याचे आढळून आले.  


या प्रकरणावर युक्तिवाद होऊन अखेर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य सुहास आळशी, उदयकुमार सोनवणे यांनी डॉ  द्वारकदास नारायण राठी यांनी गुडघे दुखीची रुग्ण  कल्पना गवांदे यांच्या उपचार सेवेत हलगर्जीपणा,सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचार केला असल्याचा निर्वाळा देत रुग्णास झालेल्या त्रासापोटी 45 दिवसांच्या आत दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. निर्धारित कालावधीत रक्कम अदा केली नाही, तर 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्याचे आदेश डॉ राठी यांना दिलेत. कल्पना गवांदे यांच्यातर्फे ऍड. मोहम्मद इलियास शेखानी यांनी कामकाज बघितले.

टिप्पण्या