Akot crime: कर्जाची रक्कम फेडण्यासाठी अकोट मधील व्यापाऱ्याला मागितली पाच लाखांची खंडणी; पाथर्डी येथील युवकास अटक , आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी



भारतीय अलंकार 24

अकोला : अकोट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी व अडते अशोक गोठवाल यांना पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीस अटक केली असून,न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


गोठवाल यांनी २५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडले असता एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मागणीचे पत्र मिळाले. त्यामध्ये पाच लाख रुपयाची खंडणीची मागणी करण्यात आली. सोबतच खंडणी न दिल्यास अशोक गोठवाल व त्यांच्या मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या करण्याचा इशारा आरोपीने दिलेल्या धमकी पत्रात केला होता. आरोपीला सापळा रचून मंगळवारी पोलिसांनी अटक केली. 


आरोपीच्या मुसक्या आवळल्या


अकोट  शहरातील व्यापाऱ्याला खंडणीची मागणी होताच व्यापाऱ्याने अकोट शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार फिर्याद निंदविली.  फिर्यादीची गंभीर दखल घेत अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांनी ठाणेदार प्रकाश अहिरे व ग्रामीणचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या पथकाचे गठन करीत सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या कारवाई पथकामध्ये १७ जणांचा समावेश करण्यात आला होता. 


 

फिर्यादी अशोक गोठवाल यांना तक्रारीनंतर पोलिसांनी  पैशाची बॅग खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने जिथे सांगितले तिथे ठेवून देण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस या ठिकाणी सापळा रचुन ठाम होते. पैशाची बॅग ठेवल्यानंतर गोठवाल हे परतले.अन् थोड्या वेळानंतर म्हणजेच मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खंडणी मागणारा तेथे आला, त्याने बॅग उचलली. हे पाहताच ३ चार तासांपासून भर पावसाळ्यात जीवाची परवा न करता मोठ्या गवताच्या आड सापळा रचुन बसलेल्या पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. आशिष कन्हैयालाल सिकची (रा पाथर्डी वय ३२ वर्ष) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे . आशिष हा शेतकरी असून अशोक गोठवाल यांच्याकडे शेतमाल खरेदी विक्री करीता आणत असल्याने त्याला गोठवाल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती होती.आता पोलिसांनी आशिष विरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल केले असून त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.


अशोक आबा नमस्कार!

अशोक आबा नमस्कार, मी तुम्हाला चांगल्याने ओळखतो आणि तुम्ही मला ओळखत असणार, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. माझी परिस्थिती खूप बिकट असून मी अत्यंत गरीब आहे. माझ्या अंगावर खूप कर्ज झालंय, लोकांचे मला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मला तुम्ही पाच लाख रुपये द्या. पैसे न दिल्यास मी तुमचा मुलगा अमोल आणि तुम्हाला दोघांनाही ठार मारून टाकेल. आणि स्वतःही नंतर आत्महत्या करणार. त्यामुळे तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, पैसे दिल्यास तुमचं काही हलकं भारी होणार नाही, कारण तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता अकोट आणि लोहारी रस्त्यावरील एमआयडीसी जवळ असलेल्या प्रधानमंत्री सडक योजना या बोर्डाजवळ पैशाची बॅग ठेवून परत जा ; अशी विनंती करतो. 




 पोलिस कारवाई पथक


अकोला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर  यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर चे ठाणेदार प्रकाश अहिरे, अकोट ग्रामीणचे ठाणेदार नितीन देशमुख, अकोट शहरचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे, ऊमेश सोळंके, नासीर शेख, सागर मोरे,विशाल हिवरे, मनिष कुलट, राजेश वसे, सुलतान पठाण, सुनील नागे, विलास मिसाळ, अमोल बुंदे, सचिन कुलट, रूकेश हसुळे, भास्कर सांगळे, आरसीपीचे नारायण देवळे, रुपाली मानकर यांचा समावेश होता. 




"अकोट उपविभागातील नागरिकांना अशाप्रकारे कोणी खंडणीची मागणी करत असेल तर नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसां सोबत संपर्क करावा आम्ही अशा गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करू."



 रितू खोखर (आयपीएस)

उपविभागीय पोलिस अधिकारी ,  अकोट

टिप्पण्या