ST Employee financial fraud case: अकोट न्यायालयाने सदावर्ते दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज केला मंजूर; तूर्तास दिलासा

                                             file pic




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: संपकरी एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते व त्याची पत्नी जयश्री पाटील या दोघाना आज आकोट न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. यामुळे सदावर्ते दांपत्याला अकोट पोलिसांकडून होणारी अटक यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.


सदावर्ते यांनी आपल्या वकीलांमार्फत 20 एप्रिल रोजी अटकपूर्व जामीनासाठी आकोट  न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी या अर्जावर सुनावणी झाली. न्यायलयाने यावर 22 एप्रिलपर्यंत निकाल राखून ठेवला होता. 



आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश (अकोट, जि. अकोला) चकोर बाविस्कर यांनी निर्णय दिला.  आरोपी सदावर्ते दाम्पत्याचा अर्ज मंजुर केला. दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन बहाल करून काही अटी घातल्या आहेत.



असा आहे आदेश


अर्जदार आरोपी क्र 1 गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते व आरोपी क्र.2 जयश्री पाटील यांना आकोट शहर पोलीस ठाण्यात नोंद गुन्हा क्र. 233/2022 या कामी अटक करण्यात आल्यास त्याना त्वरित रु. 25,000 चे व्यक्तीगत बंधपत्र आणि रु. 74,400 जमा केल्यानंतर त्वरित जामिनावर सोडण्यात यावे. 



अर्जदार आरोपी यांनी तपासात संपूर्ण सहकार्य करावे. तपासणी अधिकारी आदेशित करतील त्याप्रमाणे स्वतःला नियमाप्रमाणे चौकशीकामी हजर ठेवावे. आरोपींनी फिर्यादी आणि इतर साक्षीदारांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क करु नये. 



या आदेशामुळे गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. अकोट पोलिसांकडून होणारी अटक यापासून तूर्तास सुटका मिळाली आहे.मात्र तपास अधिकारी यांना तपास कामी आवश्यक वाटल्यास सदावर्ते यांना अकोट येथे आणल्या जावू शकते. 




या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अधिवक्ता अजित देशमुख काम पाहत आहेत.




टिप्पण्या