Kirtan festival- akola city- satsang: समाज परिवर्तनाची ताकद केवळ कीर्तनात- हभप महेश महाराज ; 'नाचू कीर्तनाचे रंगी' किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

हभप महेश महाराज मारवाडी यांच्या कीर्तनाने किर्तन महोत्सवाचा प्रारंभ झाला (सर्व छायाचित्र ॲड नीलिमा शिंगणे जगड)






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कीर्तन व सत्संग मध्ये सामाजिक  परिवर्तन करण्याची ताकद आहे. या सत्संग, कीर्तनाची सर्वप्रथम सजग प्रहरी ही खऱ्या अर्थाने युवाशक्ती झाली पाहिजे. युवा शक्तीची कीर्तनातील ही गर्दीची नांदी समाज परिवर्तनाचे गमक असल्याचे विचार हभप महेश महाराज मारवाडी यांनी व्यक्त केले.



 

सार्वजनिक वारकरी कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने जवाहर नगर येथील संभाजी पार्क मध्ये बुधवारी किर्तन महोत्सव प्रारंभ झाला. या किर्तन महोत्सवात हभप मारवाडी महाराज यांनी पहिले पुष्प गुंफले. 





ते पुढे म्हणाले की, देशाचे श्रेष्ठत्व हे अगदी पुराणातही उल्लेखित आहे. ज्या देशांमध्ये गंगा वाहते तो देश श्रेष्ठ आहे. देशात दोन गंगा मातेने जन्म घेतला. एक भागीरथने या पृथ्वीतलावर  गंगा आणली तर एक शुकाच्या माध्यमातून उगम पावली. एक गंगा अंगुष्ठातून निर्माण झाली तर दुसरी मुखातून. म्हणूनच या देशात विचाराला महत्त्व असल्याचे त्यांनी मुखाच्या संदर्भाने सांगितले. मात्र ही गंगा आज खऱ्या अर्थाने कलुषित झाली आहे. दुसऱ्या देशात नद्यांना केवळ नद्या म्हणतात. पण आपल्याकडे नदीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मात्र या मातेला आपण आपले निर्माल्य व घाण वाहून कलुषित करतो. जेथे माता म्हणत नाही अशा देशात नद्या या पवित्र व स्वच्छ आहेत. म्हणून नद्यांना नव्या दमानं स्वच्छ करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या या कीर्तनात केले.



सर्वप्रथम हभप मारवाडी महाराज यांचे मनपाचे पांडे, अविनाश देशमुख यांनी स्वागत केले. संचालन शरद ढगे यांनी तर व्यवस्थापन सागर कावरे व त्यांच्या संपूर्ण टीम ने केले. कीर्तनाला अबाल वृद्धांनी हजेरी लावली होती.

 

26  एप्रिल पर्यंत जवाहर नगर परिसरातील राजे संभाजी पार्क येथे सायं 7-30 ते रात्री 9-30 वाजेपर्यंत आयोजित या  कीर्तन उत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक वारकरी कीर्तन महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 




                    आजचे किर्तन 

                  गुरूवार 21 एप्रिल 

         हभप शिवाजी महाराज बावस्कर 

                  (गाडेगाव जळगाव)

टिप्पण्या