madhuri date-india-sri lanka-sport: गृहिणी, ब्युटीशियन ते ॲथलिट; अकोल्याच्या माधुरी दाते यांनी श्रीलंकेत उंचविला भारताचा ध्वज

                                   madhuri datey



ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: व्यवसायाने ब्युटीशियन असलेल्या 53 वर्षीय माधुरी दाते यांनी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथे 19 व 20 फेब्रुवारी पार पडलेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत ५० ते ५५ या वयोगटात भारताचे प्रतिनधीत्व करीत 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावित देशाचा तिरंगा ध्वज अभिमानाने उंचविला.


उत्तम गृहिणी, कुशल ब्युटीशियन 


माधुरी दाते या तीस वर्षापासून ब्युटीपार्लर चालवितात. त्यांचे पती प्रकाश दाते हे भारतीय वायु सेना व भारतीय स्टेट बँकेतील नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. उत्तम गृहिणी, कुशल ब्युटीशियन अशी ओळख मिळवलेल्या माधुरी दाते यांनी आता आंतरराष्ट्रीय मास्टर्स धावपटू अशी ख्याती प्राप्त केली आहे.



'सुवर्ण कन्या'


२०१४ पासून माधुरी यांनी विविध मास्टर्स राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाचे दमदार कामगिरी करून अनेक पदके पटकाविले. २०१७ साली चार सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्यांना 'सुवर्ण कन्या' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०१८ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत मास्टर्स ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत रजत पदक पटकाविले. २०१९ अकोल्याचा विभागीय पुरस्कार देखील माधुरी यांनी पटकावला. जानेवारी 2022 ला अकोल्यात पार पडलेल्या राज्यस्तर स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक रजत पदकाची कमाई करीत माधुरी यांनी थेट कोलंबो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. 



प्रेरणदायी कामगिरी


कोलंबो (श्रीलंका) येथे रविवारी पार पडलेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत  १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. माधुरी यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर पहिल्या सत्रात २०० मीटर आणि दुसऱ्या सत्रात ४०० मीटर धावण्यात कास्य पदक पटकाविले. मात्र, १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चवथ्या आल्याने त्यांचे थोडक्यात पदक हुकले,याची खंत माधुरी यांना आहे. मात्र,माधुरी दाते यांचा गृहिणी, ब्युटीशियन ते ॲथलिट असा प्रवास सामान्य स्त्रियांसाठी निश्चीतच प्रेरणादायी ठरणार आहे.


टिप्पण्या