Winter Session-mumbai- Akola: विधीमंडळात अकोला: बॉयलर स्फोटात कामगार मृत्यू प्रकरणी आठ दिवसात आरोपींना अटक अन्यथा अधिकार्‍यावर कारवाई

Winter Session: Akola in Legislature: Accused arrested in boiler blast case in eight days, otherwise action taken against the officer



ठळक मुद्दा

संदीप पाटील यांच्या निवेदनावरून आ. विनायकराव मेटे यांची विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:जिल्ह्यातील अकोला ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा जवळ सुरू असलेल्या ईगल कंपनीच्या डांबर प्लांट मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या निवेदनावरून आ. विनायकराव मेटे यांनी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्यावर सरकार कडून आठ दिवसात आरोपींना अटक करण्यात येईल तसे झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.




        

रिधोरा जवळ असलेल्या ईगल कंपनीच्या डांबर प्लांट मध्ये गेल्या 24 नोव्हेंबर रोजी स्फोट झाला होता. या स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाला. एवढ्या गंभीर घटनेनंतरही या प्रकरणात पोलिसांकडून उशिराने गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक झाली नाही. याप्रकरणी संबंधित आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करून या कंपनीला काळया यादीत टाकण्यासाठी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांना निवेदन दिले होते. त्यावरून आ. विनायकराव मेटे यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडून याप्रकरणी सरकारला जाब विचारला. इतर आमदारांनी सुद्धा या मुद्द्यावर आवाज उठविला. या लक्षवेधीला उत्तर देताना ना. बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले की काही कारणामुळे उशीर झाला असला तरी येत्या आठ दिवसात संबंधित आरोपींना अटक करण्याची कारवाई केली जाईल. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल. कंपनीवर कार्यवाही करण्यासाठी श्रम आयुक्त कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. या लक्षवेधीला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार आता लवकरच संबंधित आरोपींवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. आठ दिवसात आरोपींना अटक होणार की नाही आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी सरकार कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.




आरोपींना अटक आणि मजुरांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही- संदीप पाटील

       


या प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या संबंधित आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही आणि मूळ मालकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. कामगारांच्या जीविताची काळजी नसलेल्या कंपनीला काळया यादीत टाकुन कामगारांना न्याय मिळेपर्यंत आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करू. सरकारने न्याय दिला नाही तर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करू, अशी भूमिका शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या