Supreme Court:election 2021: निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गोपिकिशन बाजोरिया यांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक; खंडेलवाल यांच्या विरोधातील याचिका फेटाळली





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: स्थानिक प्राधिकारी अकोला वाशिम बुलडाणा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना सर्वोच्च न्यायालयातही आज चपराक मिळाली. 

वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविणारे याचिका उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील आज फेटाळली आहे.




गोपीकिशन बाजोरिया यांनी वसंत खंडेलवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत असतानाच खंडेलवाल यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात आक्षेप नोंदविले होते. त्यांनी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधातही यासंदर्भात 3 डिसेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 



वसंत खंडेलवाल यांनी 22 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला; परंतु या अर्जावर बाजोरिया यांचे निवडणूक प्रतिनिधी रमेश बजाज आणि पराग कांबळे यांनी आक्षेप नोंदविले आणि मुबई उच्च न्यायालयात २६ नोव्हेंबर रोजी याचिका दाखल केली. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. त्यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने देखील गुरुवारी, ९ डिसेंबर रोजी ही याचिका फेटाळल्याने वसंत खंडेलवाल यांना दिलासा मिळाला. 

सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नगर्थाना यांच्या खंडपीठसमोर ही याचिका विचाराधीन होती.




या निवडणुकीत वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीने  महविकास आघाडीचे धाबे दणाणले. त्यामुळेच बाजोरिया यांच्याकडून सर्व आघाड्यांवर प्रयत्न केले जात आहेत. बाजोरिया यांना न्यायालयात चपराक मिळाल्याने महविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे चर्चा भाजपा गोटात सुरू आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा