अकोट-अकोला महामार्गवरील चिखलामुळे वाहन धारक त्रस्त
गोरक्षण रोड परिसरात वीज कोसळली
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : विदर्भातील अनेक जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली.अकोल्यातही पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार पाऊस आणि गारपीटमुळे अकोला जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेती आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाल. मोठ्या आशेने शेतातून काढलेलं पीक शेतकऱ्यांनी बाजारात विकण्यासाठी आणलं होते.मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतमाल माती मोल झाला आहे.
हजारो क्विंटल सोयाबीन आणि चण्याचा नुकसान
अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला माल अचानक आलेल्या पावसामुळे भिजल्याने आता या मालाला किंमत कमी मिळणार आहे. चणा आणि सोयाबीन मालाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावून घेतला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती साचलेल्या या पाण्यामुळे हजारो क्विंटल सोयाबीन आणि चण्याचा नुकसान झाल्याने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी,अशी अपेक्षा काटेपूर्णा येथील शेतकरी अनिल उमाळे यांनी व्यक्त केली.
अचानक झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान. हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांची मागणी
28 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अचानक वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला, म्हणून सरकारने कुठलेही पंचनामे करण्यामध्ये वेळ न घालवता सरसकट राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा म्हणतो; परंतु जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याकडे बघण्यासाठी सरकारला वेळ आहे का, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो.
काल अचानक झालेल्या वादळी पावसाने जे तुरीचे पीक हाताशी आले होते ते पूर्णपणे शेतात झोकून पडले त्याचे मातीत रूपांतर झाले. आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे याचे उत्तर सरकार देईल का रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, म्हणून सरकारने फक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अश्या प्रकारचे वक्त्यव्य न करता कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्यामध्ये वेळ न घालविता सरसकट मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. अन्यथा शिवसंग्राम संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे मत या ठिकाणी पाटील यांनी व्यक्त केले आहे.
अकोट-अकोला महामार्गवरील चिखलामुळे वाहन धारक त्रस्त
अवकाळी पावसाने अकोट-अकोला महामार्गवरील चिखलामुळे वाहन धारक त्रस्त झाले. काल झालेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक गाड्या फसल्या आणि हा मार्गसुद्धा बाधित झाला होता. या महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षा पासून सुरू आहे. काम संथ गतीने सुरू असुन देवरी फाटा ते कुटासा फाटा व पळसोद फाटा ते चोहट्टा बाजार पर्यंत संबंधित ठेकेदाराने पुर्णपणे रस्ता उकरून त्यावर माती टाकली आहे. काल अचानक अवकाळी पाऊस पडल्याने हा रस्ता चिखलमय होवून रस्त्यावरून जाणारे अनेक वाहन या चिखलात फसले. या मार्गाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
गोरक्षण रोडवर वीज कोसळली
अकोला शहरातील गोरक्षणरोड येथील पॉवर हाऊस समोरच्या विद्युत खांबावर वीज कोसळली. हा थरार अनेकांनी मंगळवारी अनुभवला. नशिब बलवत्तर म्हणून वीज खांबापासुन 40 ते 50 फुट अंतरावर असलेल्या दुकानाच्या अडोशाने आणि पानटपरी व चहाठेल्यावर उभे असलेल्या नागरिकांचा जीव वाचला. विद्युत खांबाला अर्थिग असल्याने कोसळलेली वीज सरळ जमीनीत गेली. अन्यथा या ठिकाणी भयंकर घडले असते. आकाशीय वीज जमिनीत जाताच परिसरातील दुकानाच्या अडोशाने आणि पानटपरी व चहाठेल्यावर उभ्या असलेल्याना जमिनीतून झटके येवू लागल्याचे नागरिकांनी अनुभवले. कोसळलेली वीज ही मु़ळ वीजेतून तुटून ती शहरात पडली असावी, अशी माहिती हवामान तज्ञानी सांगीतले.
मंगळवारी दुपारी अचानक जोऱ्याचा वारा आणि गारपीटसह पाऊस सुरु झाल्याने पॉवर हाऊस समोर असलेल्या दुकाना समोर बऱ्याच नागरिकांनी आडोसा घेतला होता. यावेळी आभाळात प्रचंड मेघ गर्जनेसह वीज चमकत होत्या. यावेळी दुकानांच्या आडोशाला उभे राहून आकाशातील नजारा बघत असताना, लख्ख प्रकाश व आवाजासोबत एक वीज दुकानाकडे येते की काय ? असे सर्वाना वाटू लागले पण दुकानाच्या अगदी समोरचं असलेल्या एका विद्युत खांबावर ती वीज कोसळली आणि अर्थिगमुळे सऱळ जमीनीत गेली. या दृश्याने एक महिला किंचाळू लागली तर जवळच्या परिसरात उभ्या असलेल्यांना जमीनीतून करंट लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेतून सर्व सुखरूप वाचले. कुठलीही जीवित वा आर्थिक हानी झाली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा