Election 2021: अकोला वाशिम बुलडाणा येथे मतदान प्रक्रिया पूर्ण: 98.30 टक्के झाले मतदान; आमदार बाजोरिया की वसंत खंडेलवाल जिंकणार? फैसला होणार आता मंगळवारी




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-वाशिम - बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिन्ही जिल्हा मिळून 98.30 टक्के एवढे मतदान झाले आहे. शिवसेना भाजप पक्षात मतदान केंद्रावर झालेल्या वाद वगळता निवडणूक  प्रक्रिया शांततेत पार पडली.



या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून वसंत खंडेलवाल उभे राहिले.



शिवसेना भाजपात वाद



या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यातून एकूण 822 मतदार आहेत. अकोल्यात मतदान केंद्रावर शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या वाद वगळता मतदान शांततेत पार पाडले.



तिन्ही जिल्ह्यात एकूण 98.30 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. 



या ठिकाणी 100 टक्के मतदान


अकोट, तेल्हारा ,बाळापूर ,पातूर, मुर्तीजापुर ,वाशिम ,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, देऊळगाव राजा ,सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, आणि नांदुरा येथे 100% मतदान झाले आहे.



अकोला शहरात 99.29 % मतदान



अकोला शहरात 99.29 %, बुलढाणा शहरात 99.02 %, शेगाव मध्ये 93.75 %, मलकापूर येथे 84.38 %, तर सर्वात कमी मतदान बार्शिटाकळी येथे 75% झाले आहे. 



आज पार पडलेल्या मतदानात 822 मतदार पैकी 808 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून मतमोजणी अकोला येथे 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

टिप्पण्या