Election 2021: विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशिम मतदारसंघाची निवडणूक; दुपारी 2 वाजेपर्यंत 46.96 टक्के मतदान




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे या मतदारसंघातील तिन्ही जिल्ह्यातील 822 मतदार निवडणूक रिंगणातील दोन उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद होत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत तिन्ही जिल्हा मिळून 46.96 टक्के एवढे मतदान झाले.




822 मतदार



विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होत आहे. मतदारसंघातील अकोला, तीन बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यातील 22 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे. मतदान प्रक्रियेत 822 मतदार निवडणूक रिंगणातील शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या भवितव्याचा फैसला आज मतपेटीत बंद होत आहे.



435 महिला व 387 पुरुष मतदार



विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत संबंधित तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्याचे सभापती आणि महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतचे सदस्य असलेल्या एकूण मतदारांची संख्या 822 आहे. त्यामध्ये 435 महिला आणि 387 पुरुष मतदारांचा समावेश आहे.




शांततेत प्रारंभ



दरम्यान आज सकाळी 8 वाजता मतदानास शांततेत प्रारंभ झाला. अकोला येथील बी आर हायस्कुल मतदान केंद्रावर निवडणूक निरीक्षक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कुठलाच अनुचित प्रकार आढळून आला नाही.



कोविड नियम


मतदान केंद्रावर कोविड नियमांचे पालन करण्यात आले.मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले.


महापौरांनी केलं मतदान


अकोला शहराच्या प्रथम नागरिक महापौर अर्चना मसने यांनी बी आर हायस्कुल मतदान केंद्र येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.



सकाळी 10 पर्यंत अल्प प्रतिसाद



सकाळी 10 वाजेपर्यंत केवळ 4.14 टक्के मतदान झाले. 12 वाजेपर्यंत 16.06 टक्के एवढे मतदान झाले. या नंतर वेग वाढून दुपारी 2 वाजेपर्यंत 46.96 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.




मंगळवारी मतमोजणी



विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, १४ डिसेंबर रोजी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात होणार आहे.




टिप्पण्या