Akola news letter: पातुर येथील लाभक्षेत्र व बुडीत क्षेत्रावरील जमिन खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंधात सुट व इतर महत्वाच्या बातम्या वाचा सविस्तर



 

अकोला, दि.१७:  पातुर लघु पाटबंधारे प्रकल्पातील चिंचखेड व सावरखेड येथील बुडीत क्षेत्र ३२.४० हे.आर तसेच चिंचखेड, बोडखा व पातुर येथील लाभक्षेत्र २९० हेक्टर आर क्षेत्रातील जमीनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध उठविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  निर्गमित केले आहेत.


या संदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी प्रमाणित केले आहे की,  या प्रकल्पाचे भूसंपादन तथा पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आणखी खाजगी जमीन  संपादन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री हस्तांतरण व्यवहारावरिल निर्बंध उठविण्याट यावे,असा प्रस्तावही सादर केला होता. त्यानुसार ह्या गावाच्या परिमंडळातील जमिनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध भुसंपादन अधिकारी यांचेकडे सुरु असलेल्या प्रकल्पा व्यतिरिक्त लाभक्षेत्रातील जमीनीचे खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंध उठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

                      ******



ग्रामपंचायत पोटनिवडणूक: निवडणूक कार्यक्रम जाहीर 18 जानेवारी रोजी मतदान; 19 ला मतमोजणी


अकोला दि.17: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मागास प्रवर्गातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम स्थगिती दिली असून मागास प्रवर्गातील रिक्त जागा सर्वसाधारण करुन  ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.,पं.स. ग्रा.प. निवडणुक विभागाचे संजय खडसे यांनी दिली.


            

जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील 10, मुर्तिजापूर येथील आठ, अकोला येथील एक, बाळापूर येथील तीन, बार्शीटाकळी येथील चार व पातूर येथील एक असे एकूण 27 ग्रामपंचायतीत निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. 


कार्यक्रमानुसार आचारसंहितेचा कालावधी हा मतमोजणीच्या सुधारित दिनांकापर्यंत लागू राहिल. निवडणुकीची नोटीस सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. 28 डिसेंबर रोजी पासुन सुरु होणार असून सोमवार दि. 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारांना सार्वत्रिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे छाननी मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी तर नामनिर्देशपत्रे मागे घेणे गुरुवार दि. 6 जानेवारी आहे. तसेच निवडणुक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी दुपारी तीन नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर मतमोजणी बुधवार दि. 19 जानेवारी रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुक निकालाची अधिसुचना सोमवार दि. 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल, असे आदेशाव्दारे कळविले आहे.

                      ******



ग्रामपंचायत पोट निवडणूक; दि.२० ते२२ मद्यविक्री बंद


 

अकोला, दि.१७: जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतीमधील ४०३ रिक्त पदाच्या पोट पोटनिवडणुक होत आहेत. तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.२०), मतदानाच्या दिवशी (दि.२१) व मतमोजणीच्या दिवशी (दि.२२) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


                    ******


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भित्तिचित्र स्पर्धा



अकोला, दि.१७: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला व डॉ. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील एतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची माहिती, स्वच्छता इ. विषयावर भितींवर चित्रकलेद्वारे  प्रदर्शित केली जाणार आहे. आज जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवार भिंतीवर चित्रण करुन या स्पर्धेस आज प्रारंभ झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, डॉ. बाबासाहेब ढोणे महाविद्यालयाचे  प्रा. गजानन बोबडे आदी उपस्थित होते. या भित्तीचित्र स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ७५ चित्रकार व  चित्रकला महाविद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.  या स्पर्धेत शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, प्रमुख घटना, स्वच्छतापर संदेश, पर्यावरण, जिल्ह्यातील महत्वाचे स्थळे अशा विविध  विषयाचे चित्रण केले जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यात प्रथम पारितोषिक पाच हजार, व्दितीय पारितोषिक चार हजार व तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये आहे. या स्पर्धेला नाशिकचे चित्रकार बाळ नगरकर व हिंगणघाटचे चित्रकार हेमंत मोहड हे परीक्षक  म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


                     ******



निर्यातक्षम आंबा व डाळींब फळबागांची मँगोनेट व अनारनेट ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन


अकोला, दि.१७: निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेचे मँगोनेट व अनारनेट या प्रणालीवर नोंदणीकरीता शुक्रवार दि. ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आंबा व डाळींब पिकांखालील क्षेत्र व निर्यातीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त निर्यातक्षम फळबागांचे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे येथील फलोत्पादन व कृषी आयुक्तालयाचे संचालक  डॉ.कैलास मोते यांनी केले आहे.


            

निर्यातक्षम फळबागेची नोंदणी करण्यासाठी मॅगोनेट व अनारनेट ही ऑनलाईन प्रणाली गुरुवार दि. १६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन २०२१-२२  मध्ये मॅगोनेट प्रणालीवर  ११ हजार ९९५ आंबा व  अनारनेटवर एक हजार ५१८ डाळींब फळबागांची नोंदणी झाली आहे. सर्व जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यानुसार निर्यातक्षम आंबा व डाळींब फळबागेची नोंदणी व तपासणी करणेकरीता कृषी सहाय्यक,  कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. निर्यातक्षम फळबागांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अपेडाव्दारे फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपव्दारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ॲपव्दारे निर्यातक्षम फळबागांची नोंदणी करणेसाठी दि. १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जास्तीत जास्त आंबा व डाळींब  उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांची  नोंदणी  करुन  घ्यावी. अधिक माहितीसाठी  आपल्या नजिकच्या कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी  यांच्याशी संपर्क साधावा.



टिप्पण्या