ST employees: Diwali 2021: जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – परिवहन मंत्री परब यांचे आवाहन

ST employees should resume work to avoid inconvenience to the public - Transport Minister Parab's appeal (file image)




ठळक मुद्दा

सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा 






मुंबई,दि.१ : एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले.


श्री. परब म्हणाले, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. राहिलेल्या मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक आहे. यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येणार आहे.



गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असताना देखील आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.



संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परिवहनमंत्री श्री.परब यांनी सांगितले.

टिप्पण्या