Amravati-Akot-curfew-Akola-city: अमरावती,अकोट नंतर अकोला शहरातही आता 19 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी: समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर, विशेषतः समाज माध्यमांवर लक्ष!

After Amravati and Akot, curfew in Akola till November 19



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : काही दिवसआधी अमरावती येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अकोला शहरात देखील आज पासून 19 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.याप्रमाणे 4 ते 5 लोकांना एकत्रित जमा होण्यावर बंदी असणार आहे तर संचारबंदी ही सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे. या संचारबंदीमध्ये आरोग्य विषयासाठी केवळ मुभा देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये केवळ आरोग्य विषयक सेवा आणि शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरू राहणार आहेत. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन देखील प्रशासनच्या वतीने केले आहे. त्याच प्रमाणे प्रक्षोभक मेसेज अथवा फोटो किंवा व्हिडीओ पाठवणाऱ्यांनावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.


अमरावती हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातही संचारबंदीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांनी आज १७/११/२०२१ रोजी दिले आहेत.   


असा आहे आदेश


अमरावती शहरात त्रिपुरा घटने संदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन संचारबंदी लागु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने अकोला शाहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात सूचित केले आहे.


त्याअर्थी संपूर्ण अकोला शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दि. १७/११/२०२१ दुपारी १२.०० वाजता पासून ते दि. १९/११/२०२१ चे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम-१४४ अंतर्गत खालील प्रमाणे जमावबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात येत आहेत.


 *सकाळी ०६.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. सदर जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार कींवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतीबंध राहील. तसेच विधानपरिषद निवडणुक संदर्भात नामनिर्देशन पत्र दाखल करणे याबाबत सुट राहील.


*संध्याकाळी ०७.०० ते सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरु राहतील व शासकीय कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरु राहतील. सदर आदेशाचे काटेकारपणे पालन करुन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा.


अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी 



अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम  आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 आणि 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान,आता पुन्हा 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तर, अकोट शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे.



12 नोव्हेंबरला अमरावतीत घडली घटना


12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. या हिंसक कारवाइचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले होते. यावेळी सुद्धा भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.


12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिली होती.



सायबर सेलचे लक्ष

दरम्यान, मंगळवारी अकोला शहरात रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोहता मिल स्मशानभूमी नजीक काही चारचाकी वाहनांची काचे फोडल्याची वार्ता पसरली होती. सदर माहिती पसरताच भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची भेट घेत सदर प्रकरणाचा तपास करीत तोडफोड करणाऱ्या कंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारची तोडफोड झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात अजून आली नाही आणि अफवा उडालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुद्धा काही आढळून आले नाही त्यामुळे कृपया नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रामदास पेठ पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. यासोबतच अश्या अफवा पसरविणाऱ्या कंटकांवर पोलिसांच्या सायबर सेलचे लक्ष असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले.



टिप्पण्या