The terror: leased tiger:Telhara: तेल्हारात पट्टेदार वाघाची दहशत कायम; आज बेलखेड परिसरात वाघाने केली दुधाळ गायीची शिकार

The terror of the leased tiger persists in Telhar;  Today, tigers hunted cows in Belkhed area








नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: तेल्हारा तालुक्यातील रायखेड कोठा परिसरात वाघाने एका बैलाची शिकार केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम असतानाच, आज पहाटे बेलखेड परिसरातील एका दुधाळ गायीची शिकार या वाघाने केली असल्याचे समोर आल्याने वाघाची दहशत अवघ्या तेल्हारा तालुक्यात पसरली आहे.  



आज पहाटे बेलखेड येथे अगदी गावाजवळील शेतात बेलखेड येथील गणेशराव वाकोडे यांच्या गायीची शिकार वाघाने केली असल्याचे आढळले. या गायीची किंमत अंदाजे पन्नास हजार होती. नुकसान भरपाई तातडीने मिळावी,अशी मागणी गावकऱ्यांनी केली. 



पंचनामे घेणे सुरू 


शिकार झालेली गाय रात्रीच्या वेळी गोठयात बांधलेली होती. तरी देखील वाघाने शिकार करून जवळपास 100 मीटर अंतरावर नेवून गायीवर ताव मारल्याचा खुणा निदर्शनात आल्या. या गायी सोबत तिचे वासरू देखील होते. मात्र, वासरूला कोणतीही इजा झालेली नाही. या वासरू समोर गायीला वाघाने नेले असल्याने वासरू हंबरडा फोडत आहे. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पणावले. वनविभागाच्या पाहणी  दरम्यान अकोट वनविभाग व पशु वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व हिवरखेड पोलीस पथकाने सर्च मोहीम सुरू केली आहे. तसेच परिसराची पाहणी करून  घटनास्थळी पंचनामे सुरू केले.  






काल रायखेड ते हिंगणी रोडवर रायखेड येथील शेतकरी विनोद मोडोकार यांच्या शेतात एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली होती. काही नागरिकांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचे सांगितले.




वन विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत वाघाच्या पावलाचे ठसे व अर्धवट खाल्लेले बैलाचे धड आढळून आले आहे. त्यामुळे रायखेड कोठा परिसरात वाघाचा वावर असल्याचे दिसून आल्याने दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. वाघ दोन तीन दिवस पुन्हा या परिसरात येऊ शकतो, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन  वनविभागाने केले आहे. 

टिप्पण्या