- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
T20 World Cup 2021: क्रिकेटप्रेमींची घोर निराशा: टी- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचा तब्बल 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव; काय आहेत पराभवाची कारणे?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रीडांगण
ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
भारत विरुद्ध पाकिस्तान हा टी- 20 विश्वचषक सामना पाकिस्तानने जिंकला. भारतीय संघाच्या फलंदाजांनीच नव्हेतर गोलंदाजांनी सुद्धा अतिशय सुमार कामगिरी केली.
या सामन्यात भारताला एकही विकेट घेता आली नाही. पाकिस्तानच्या संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत प्रथमच भारताचा 10 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचा 10 विकेट्सने पराभव झाला. या सामन्यात भारतीय संघ खरोखरच कुठेही दिसला नाही आणि पाकिस्तानचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये बाजी मारताना दिसला. या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचा पाया तेव्हाच रचला गेला जेव्हा हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकला बळी पडला आणि त्यानंतर लगेचच केएल राहुलने अवघ्या 3 धावांवर आपली विकेट गमावली.
पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दणदणीत विजय मिळविला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाने या सामन्यातही ही ओळख कायम ठेवली.
भारतीय संघाचे अनुभवी सलामीवीरांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी काही वेळातच तंबूचा रस्ता दाखविला. गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात सलामीवर रोहित शर्माला बाद केले. रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. तिसऱ्या षटकात त्याने सलामीवीर के एल राहुलचा त्रिफळा उडविला. एका पाठोपाठ एक गडी फाटाफट तंबूत परतले.
फलंदाजीत कर्णधार विराट कोहली एकेरी कमान सांभाळताना दिसला. विराटने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत अर्धशतक गाठले. मात्र हे अर्धशतक निष्फळ ठरले. सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 11 धावा करुन बाद झाला. ऋषभ पंतने सुद्धा चांगली फलंदाजी केली. भारताने 151 धावांचे लक्ष पाकिस्तान संघांसमोर ठेवले होते. जे पाकिस्तानी सलामीवीरांनीच पूर्ण केले. भारताला एकही विकेट घेता आली नाही. 152 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीत आक्रमक भूमिका घेतली होती. सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी दमदार प्रदर्शन करीत अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. एकही विकेट न घेता आल्याने भारताला 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभवाला सामोरे जावे लागले.
परभावाची ही असू शकतात कारणे
रोहित शर्मा आणि केएल राहुल हे उत्कृष्ट फलंदाज आहेतच यात मुळीच शंका नाही. मात्र त्यांच्या फलंदाजीचा उपयोग महत्त्वाच्या प्रसंगी झाला नाही. रोहित शर्माला हिटमन म्हटले जाते आणि तो एक हुशार फलंदाज आहे, पण पाकिस्तान विरुद्धच्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याचा रेकॉर्ड अत्यंत खराब होता, जो या सामन्यातही दिसला. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी होती,परंतू त्याने शून्यावर बाद होऊन भारतीय संघाला दडपणाखाली नेले. यानंतर उत्कृष्ट फॉर्मात असलेला केएल राहुल अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला, त्यानंतर संघ अधिकच दडपणाखाली आला आणि त्यातून भारतीय संघाला सावरता आले नाही.
रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांना दडपणामुळे मोकळेपणाने खेळता आले नाही. जर रोहित आणि राहुल संघाला चांगली सुरुवात देऊ शकले असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता.भारतीय प्रेक्षकांची घोर निराशा झाली नसती. या सामन्याचा सकारात्मक निकाल त्यांच्या हातात होते कारण ते दोघेही खूप अनुभवी आणि चपळ फलंदाज आहेत. क्रिकेट मधील पारंपरिक शत्रू पाकिस्तान संघावरच या अनुभवी फलंदाजानी आपले खेळ कौशल्य वापरली नाही तर अफगाणिस्तान आणि नामिबिया सारख्या नवख्या संघाविरुद्ध तुम्ही काय कराल,असा सवाल भारतीय क्रिकेट चाहत्यांनी केला आहे.
या सामन्यात सूर्यकुमार यादवलाही खूप संधी होती, ज्याला मोठ्या आत्मविश्वासाने संघात आणल्या गेले होते. पण त्याने काय कामगिरी केली हे तमाम भारतीयांनी बघितले. दुसरीकडे, हार्दिक पांड्या. जर तो तंदुरुस्त नव्हता तर त्याला संघात का समाविष्ट करण्यात आले. हार्दिकला या सामन्यात मोठे फटके खेळण्याची चांगली संधी होती मात्र त्याला खांद्याने त्रास दिला.
पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असतानाच भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली. बुमराह, शमी, भुवी, जडेजा आणि वरुण चक्रवर्ती विकेट घेण्यात अपयशी ठरले. शमीने 3.5 षटकांत 43 धावा दिल्या, तर वरुणने चार षटकांत 33 धावा दिल्या. कोणताही भारतीय गोलंदाज रिझवान आणि बाबर आझम समोर प्रभावी दिसत नव्हते. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला संघाबाहेर ठेवणे हा देखील योग्य निर्णय नव्हता, असे आता म्हंटल्या जात आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा