Cruise Drugs Party case:Aryan Khan:NCB:Sameer Wankhede: क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण:एनसीबीने केली प्रेस नोट जारी, काँग्रेसनेही घेतली प्रकरणात उडी

Cruise Drugs Party case: NCB issues press note





मुंबई:  क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यात  अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, यावर आता मुंबई एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबत एक प्रेस नोट एनसीबीने आज जारी केली आहे.




एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल करुन अनेक धक्कादायक खुलासे यात केले आहेत. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा  आरोपही केला आहे. याच आरोपांवर एनसीबीने स्पष्टीकरण जाहीर केले आहे.  एनसीबी या आरोपांचा खुलासा करण्यास खरं तर पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, पत्रकार परिषद रद्द करुन एनसीबीने एक प्रसिद्ध पत्रक जारी करून आपली भूमिका मांडली आहे. तसेच पत्रका द्वारे एनसीबीने साइल यांना कोर्टामध्ये आपले म्हणणे मांडण्याचा सल्ला दिला आहे.


एनसीबीचे मुंबई प्रदेश उपसंचालक जनरल मुथा अशोक जैन यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, 'आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायलयात आहे. या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साइल यांना मत मांडायचे होते तर त्यांनी सोशल मीडिया ऐवजी न्यायालयात मांडायला पाहिजे होते. त्यांनी सोशल मीडियावर काही लोकांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडण केले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी आणि तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या डायरेक्टरांकडे पाठवत असून, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल', असे एनीसीबीच्या प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.


समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका


दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राव्दारे खोट्या आरोपांपासून संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. वानखेडे यांनी पत्रात म्हटले आहे की, एनसीबीच्या नोंदणीकृत प्रकरण क्र 94/2021 मध्ये माझ्या विरोधात चुकीचे आरोप केले जात असून, काही अज्ञात लोकांकडून मला धोका संभवत आहे.



या प्रकरणी एनसीबीचे उपसंचालक मुथा अशोक जैन यानी एनसीबी डायरेक्टर जनरल यांना या प्रकरणी अहवाल पाठवून वस्तुस्थिती अवगत केली आहे. मात्र, त्यानंतरही मला सेवेतून काढून टाकण्याच्या तसेच आणि अटक करण्याबाबत सार्वजनिक माध्यमांतून अंत्यत जबाबदार व्यक्तींकडून भिती घातली जात आहे. त्यामुळे वाईट हेतूने कारवाया करणा-यांच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती  वानखेडे यांनी पत्रात केली आहे.





उच्चस्तरीय चौकशी व्हावी-नाना पटोले

   file photo: nana patole


आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे.यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनीही याबाबत एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड सुरु आहे. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स विभागाचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजीत कट असल्याचे दिसत आहे. 

काही दिवसांपासून सातत्याने चित्रपट सृष्टीतील मंडळींना टार्गेट करुन कारवाया केल्या जात आहे. एनसीबीने गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटक केली. मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते पण १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच एनसीबी अधिका-यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.


टिप्पण्या