Seventh Pay Commission:PMC: पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – एकनाथ शिंदे यांची घोषणा

Seventh Pay Commission applicable to Pune Municipal Corporation officers and employees - Decision of Urban Development Minister Eknath Shinde



मुंबई, दि. १६ : पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात  नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत श्री. शिंदे यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.



राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्याबाबत नगरविकास विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या महासभेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा ठराव १० मार्च २०२१ रोजी केला होता. सदरचा ठराव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्याची दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या बैठकीचे आयोजन केले होते. श्रमिकांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.



सातवा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल श्री. शिंदे यांनी पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आपली सेवा ही शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या.

टिप्पण्या