Mobile thief:Talathi:Akola crime: काय सांगताय काय! महिला तलाठीच निघाली मोबाइल चोर; पोलिसांनी रंगेहाथ केली अटक

                                      संग्रहित चित्र




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आजपर्यंत चोरीच्या अनेक घटना घडल्या. ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. मात्र, अकोल्यात आज जो चोरीचा प्रकार आणि चोरी करणारा उघडकीस आला त्यावर सहजपणे कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण एका चोरीच्या घटनेतील आरोपी कोणी सराईत चोर अथवा बिकट परिस्थिती मजबुरीने चोरी करणारा नसून, चक्क शासकीय नोकरदार आहे. त्यातही महिला तलाठी. बातमी वाचून आश्चर्य वाटत असेल ना! पण हे सत्य आहे.आज पोलिसांनी या चोरट्या महिला तलाठीला रंगेहाथ पकडले आहे.



घटनेची हकीकत अशी की, अग्रसेन चौक स्थित पेट्रोल पंप येथून महिना भरापूर्वी एक अँड्रॉइड मोबाईल फोन चोरीला गेला  होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ज्यामध्ये एक महिला मोबाईल चोरताना स्पष्ट दिसत होती. त्यानंतर रामदासपेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.



रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी तपास सुरू केला. सायबर क्राइम ब्युरोच्या मदतीने तपास पथक महिला चोरा पर्यंत पोहोचली. तेव्हा पोलिसांना देखील आश्चर्य वाटले. कारण त्यांना ही महिला चोर दुसरी तिसरी कोणी नसून चक्क तलाठीपदी कार्यरत असल्याचे समजले. गायत्री असे या महिला आरोपीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग गावच्या तलाठी पदावर ही आरोपी कार्यरत आहे. तर अकोला मधील मलकापूर परिसरातील रहिवासी आहे.




पोलिसांनी आज या महिला आरोपीला मोबाईल फोनसह अटक केली आहे. विशेष म्हणजे एक महिन्यापासून दुसरे सिम टाकून हा मोबाईल ती वापरत होती. या प्रकरणामुळे संपूर्ण शासकीय महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या चोरी मागे काय कारण असेल की, सरकारी नोकरीत असलेल्या महिलेला चोर व्हावे लागले. आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने महागडा मोबाईल फोन देखील ही महिला खरेदी करू शकते. कदाचित चोरी करण्याची सवय अथवा लालची प्रवृत्ती या महिलेला चोरी करण्यास भाग पाडत असतील. चोरी मागील नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येईलच. पोलीस निरीक्षक नितीन शिंदे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



 

टिप्पण्या