Ganesh Utsav 2021: Akola city: गणेश विसर्जनकरिता यंत्रणा सज्ज: मिरवणूक मार्गावर रात्री १० वाजेपर्यंत जमावबंदी; गणपति विसर्जन होणार पण मिरवणूक नाही…

Ganesh Utsav 2021: Akola city: System ready for immersion of Ganesh: Curfew on procession route till 10 pm;  Ganpati will be immersed but there will be no procession ...





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही श्री गणपति विसर्जन साधेपणाने करण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार कुठेही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. तर अकोला शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर आज रविवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.



शहरात गणपति विसर्जन दरम्यान मार्गावर गर्दी होऊ नये, यासाठी शहरातील जयहिंद चौक ते सिटी कोतवाली जवळील गणेश घाटपर्यंत विसर्जन मिरवणूक मार्गावर जमावबंदीचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिला. गणपति विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही. परंतू अकोला शहरातील जयहिंद चौक ते सिटी कोतवाली जवळील गणेश घाट पर्यंतच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  



पोलीस बंदोबस्त


कोविड पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी शासनाने नियमावली जारी केली आहे. याचे पालन होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सार्वजनिक व प्रत्येक घरातील गणपती विसर्जनासाठी गणेश घाट व शहरात गर्दी होते. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान काल पोलिसांनी रुट मार्च काढला. गणेश घाट सिटी कोतवाली येथून सुरुवात करून जयहिंद चौक, अगरवेस, आकोट स्टॅन्ड, तेलीपुरा चौक, ताजनापेठ, गांधी चौक, त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनपर्यंत रुटमार्च काढण्यात आला. या दरम्यान पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहभागी होत, खबरदारी म्हणून काही ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्याचे निर्देश दिले.




सप्त नद्यांचे जल गणेश कुंडामध्ये


गणेश उत्सवात एकता सोबत संस्कृती जतन होवून गणेश भक्तांच्या कल्याणासाठी सप्त नद्यांचे जल गणेश कुंडामध्ये सलग दहा वर्षापासून श्री रामनवमी शोभायात्रा समिती अर्पण करीत असते. यावर्षी देखील श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते जल अर्पण करण्यात आले. स्थानिक सिटी कोतवाली परिसरातील गणेश घाट येथे विशेष पूजन करून गंगा यमुना सरस्वती गोदावरी नदीचे जल अर्पण कुंडा मध्ये टाकण्यात आले. यावेळी रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासने, किशोर मांगटे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ शर्मा, विजय तिवारी, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.  यावेळी वेद पाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने पूजा अर्चना करून विशेष प्रार्थना करण्यात आली.


टिप्पण्या