Akola Crime :अकोटफाईल पोलिसांची कारवाई: पिस्तुल घेवून फिरणारा अन विक्रीवाला गजाआड; मुख्य सूत्रधार मात्र अजूनही मोकाट…






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोट फाईल (अकोट फैल) पोलिसांनी जिल्ह्यात पिस्तुलांची विक्री करणाऱ्या आणखी एकाला काल गजाआड केले. परंतु या आरोपीला शस्त्रपुरवठा करणारे मुख्य सूत्रधार  अजूनही मोकाट फिरत आहे. खुलेआम पिस्तुल घेवून रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे. याआधी बसस्थानक परिसरातून देखील पिस्तुल विक्री करणारा आरोपींना अटक केली होती. शहरात वा जिल्ह्यात वारंवार या घटना घडत असल्याने सामान्य अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 



पिस्टल विक्री करणाऱ्या टोळींचा सूत्रधार मध्य प्रदेशातून स्वस्तात शस्त्रे आणून  अकोल्यात चढ्या किंमतीत विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, अकोट फाइल पोलीस ठाण्याचे पोलिसांनी आतापर्यंत यातील दोघांवरच अटकेची कारवाई केली आहे. शेख यासीम शेख नाझीम आणि तस्वर बेग असगर बेग असे या दोन अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. आतापर्यंत या आरोपीं कडून पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी केली आहे. 



दरम्यान, अटकेतील आरोपी पैकी एक तस्वर  बेग असगर बेग हा एकाकडून शस्त्रे खरेदी करतो. तो मुख्य सूत्रधार कडून मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणून अकोला आणि वाशिम जिल्ह्यात विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य सूत्रधाराने, अटकेत असलेल्या आरोपीसह दोन जिल्ह्यातील इतरांनाही शस्त्रे विकली असल्याने अवैध शस्त्रे खरेदी-विक्रीचे हे मोठे केंद्र स्थान असल्याचे भविष्यात उघड झाल्यास नवल वाटायला नको. दरम्यान, या प्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत. पोलिसांनी आता या अवैध व्यवसायातील बडे मासे गाळाला लावावीत, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.



सापळा रचून केली होती अटक


अकोला शहरातील आपातापा रोड वरील चौकात सापळा रचून अकोट फाईल पोलिसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीस बुधवारी अटक केली होती. आपातापा चौकात एक तरुण कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे कदम यांनी पोलीस पथक पाठविले. सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, साधना चौकातील रहिवासी असलेला एक तरुण कमरेला पिस्टल लावून फिरत असताना पथकाच्या नजरेत आला. पोलिसांनी या युवकास ताब्यात घेवून चौकशी केली. शेख यासीम शेख नाझीम असे या तरुणाने आपले नाव सांगितले. व पिस्टल एका व्यक्तीकडून विकत घेतली असल्याचेही सांगितले. पोलिसांनी शेख यासीमला याला तात्काळ  अटक करून त्याच्या जवळची देशी बनावटीची पिस्टल व जिवंत कडतुस असा २६, ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला होता. यासीमच्या सांगण्या वरून आणखी एकाला काल पोलिसांनी अटक केली आहे.


 

 


टिप्पण्या