Road accident: Buldhana: भीषण अपघात: टिप्पर उलटल्याने 13 ठार झाल्याची शक्यता; 3 गंभीर जखमी



बुलडाणा: सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर दुसरबीड गावा जवळ तडेगाव फाटा नजीक टिप्पर वाहन उलटून अपघात घडला. या अपघातात 13 जण ठार झाल्याची शक्यता वर्तविला जात आहे. तर 3 गम्भीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा भीषण अपघात आज दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास घडला.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर काम सुरू असून,येथे कामावर असणाऱ्या मजुरांना तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात झाला. टिप्पर मधून १६ मजूर प्रवास करत होते. दरम्यान, 13 जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. गंभीर जखमींना तातडीने जालना व सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.




सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक टिप्पर वाहन समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव मधील कॅम्पमध्ये जात होता. या टिप्परमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर देखील बसलेले हाेते. तडेगाव जवळ  टिप्पर अचानक रस्त्याच्या कडेला घसरला आणि खड्डयात उलटला. आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. 



घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातातील गंभीर जखमी मजूर व मृतक हे मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे समजते. अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.पावसामुळे रस्त्यात चिखल साचला असल्याने मदत कार्यास अडथळा येत आहे.यातील काही मृतक मजुरांचे शव बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. क्रेन च्या साह्याने टिप्पर उचलून मृतदेह बाहेर काढण्याचे जिकरीचे कार्य पोलीस,बचाव पथक आणि गावकरी करीत आहेत.

टिप्पण्या