Narayan Rane:political news: आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल:अटक होण्याची शक्यता; राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये- नारायण राणे

Case filed against Narayan Rane for making offensive statement: Possibility of arrest, police squad dispatched


पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी पुणे पोलिसांचे एक पथक राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. 



याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. 


घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी रात्रीच  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेवून याबाबत विस्ताराने चर्चा केली. यानंतर सकाळी पुणे पोलिसांचे एक पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यास चिपळूणकडे रवाना झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.




तीन ठिकाणी गुन्हे दाखल


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच महाग पडले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक, पुणे  आणि महाड येथे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांचे पथक देखील चिपळूनला रवाना झाले आहे. यामुळे चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


कोकणात जन आशीर्वाद यात्रा


नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा  सध्या कोकणात आहे. आज चिपळूण येथे त्यांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणे यांनी सोमवारी रायगड येथे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना   आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे राणेंचे अशाप्रकारचे विधान करणे हे राज्याचा अपमान करणारे आहे, अशा संदर्भाची तक्रार नाशिकचे शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली.




राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये- नारायण राणे


"माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. " अश्या प्रतिक्रिया आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसार माध्यमाना दिल्या.




टिप्पण्या