Independence Day 2021: 'व्यर्थ न हो बलिदान' बच्चू कडू यांनी वीर शहिदांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला स्वातंत्र्य दिन

celebrated Independence Day with the families of heroic martyrs





अकोला : आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे अगणित शहीद आहेत. स्वातंत्र्यनंतर शत्रू पासून देशाचा संरक्षण करत अनेक वीर जवानांनी आपले प्राण देशाला अर्पण केले आहेत. अशा वीरांच्या सन्मानार्थ  त्यांच्या त्यागाचे बलिदानाचे  ऋण फेडण्यासाठी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा यथोचित सन्मान करून त्यांना शाही भोजनाचा आनंद देत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा केला.


या छोटेखानी कार्यक्रमात आज पालकमंत्री बच्चू कडू यांचा संवेदनशीलपणा दिसून आला. आपला देश स्वातंत्र्यच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून वीर शहिदांच्या कुटुंबियांसोबत छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.



28 वीर शहिदांच्या कुटुंबियांसोबत जेवण


देशाचं रक्षण करीत असतांना अकोला जिल्ह्यातील 28 जवानांना वीर मरण आले आहे.या वीर जवानांच्या कुटुंबियांसोबत आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी जेवण केले.



शहिदांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी

यावेळी बच्चू कडू यांनी वीर मातांचे पाय स्वतः धुवुन त्यांची सेवा करून यथोचित सत्कार केला. कुटुंबियांना राजेशाही  थाटात चांदीच्या ताटात भोजन दिले.  स्वतः भोजन वाढले.  प्रशासनातील उच्च अधिकारी वाढपी झाले होते. याप्रसंगी पालकमंत्री यांनी कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी नीमा अरोरा या देखील वीर शाहिदांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करून मायेने घास भरविला. यावेळी वातावरण काहीसे भावुक झाले होते. काही मातांनी वीर पुत्रांच्या आठवणीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 


पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, " तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे  सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले. स्वतः ‘पूर्णब्रह्म’ असलेले ‘अन्न’ ही देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या  शहिदांच्या वारसांच्या, अशा वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या माता पितांच्या तोंडी जाऊन धन्य होत होते".

टिप्पण्या