Hotels restaurants: हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार

Hotels, restaurants will review the relaxation of restrictions in the first phase to extend the time (file photo)



मुंबई, दि. ६ : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.


राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकाच्या इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंटस असोसिएशन - आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळ समवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वर्षा येथील समिती सभागृहात ही बैठक झाली. 



मुख्यमंत्री ठाकरे  पुढे म्हणाले, आपल्याला सर्व गोष्टी पूर्वी प्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या वाढली, तर ऑक्सीजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे.




कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करणे, स्वच्छता गृहांची रचना याबाबतही सूचना केल्या.

टिप्पण्या