e-service system:Akola court: ई-सेवा प्रणालीचा लाभ वकील आणि पक्षाकारांनी घेवून पैसा व वेळेची बचत करावी- न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन

Advocates and parties should save money and time by taking advantage of e-service system: Appeal of Justice Anil Kilor





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: न्यायदानाचे काम हे सामाजिक सेवा असून शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळाला पाहिजे. ई-सेवा प्रणालीव्दारे न्यायालयीन कामकाज अधिक सोपे व सोईस्कर होणार आहे. या प्रणालीचा लाभ वकील व पक्षाकारांनी घेवून पैसा व वेळेची  बचत करावी, असे आवाहन उच्चन्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती अनिल किलोर यांनी केले. 



जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.



कार्यक्रमाला यांची प्रमुख उपस्थिती


या कार्यक्रमाला प्रमुख  जिल्हा व सत्र न्यायाधीश  यनशिवराज  खोब्रागडे, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे सदस्य ॲड. मोतिसिंह मोहता, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप  पतंगे व्यासपीठावर विराजमान होते.



कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम


न्यायमूर्ती  किलोर  पुढे म्हणाले की, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होवून ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाज करण्याची आवश्यकता निर्माण झाली. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी वकील व पक्षाकारांनी ई-सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याची आजच्या काळाची गरज आहे. 




प्रलंबित खटले कमी करण्यासाठी न्यायाधीश यांच्यासह वकीलांनी प्रयत्न

ई-सेवा केंद्राचा सर्वसामान्य नागरिकांपर्यत जनजागृती करावी. न्यायालयीन प्रक्रीया अधिक पारदर्शक व वेगवान होण्याकरीता न्यायधीश, वकील, पक्षकार व न्यायालय कर्मचारी यांनी सामूहिक सहकार्याने कामे करावे. जिल्ह्यातील प्रलंबित खटले (केस पेडन्सी) कमी करण्यासाठी न्यायाधीश यांच्यासह वकीलांनी प्रयत्न करावे, असे देखील याप्रसंगी न्यायमुर्ती अनिल किलोर म्हणाले.






कार्यक्रमाचे संचालन जी.के. खाडे यांनी केले. आभार  जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप  पतंगे यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायीक अधिकारी, विधिज्ञ आदी उपस्थित होते.

टिप्पण्या