Durand Cup 2021: Football: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी: 130 वी ड्यूरँड चषक 2021 स्पर्धा कोलकाता येथे 5 सप्टेंबरपासून

                

                 क्रीडांगण

         नीलिमा शिंगणे-जगड

The 130th Durand Cup 2021 will be played in Kolkata from September 5 to October 3.

राष्ट्रपती चषक,ड्यूरँड चषक,शिमला चषक



कोविड-19 महामारीमुळे एक वर्ष भरविता न आलेली, जगातील तिसरी सर्वात प्राचीन आणि आशियातील सर्वात प्राचीन ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धा पुन्हा घेतली जाणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, भारतीय फुटबॉल संघटनेचा पश्चिम बंगाल विभाग आणि पश्चिम बंगाल सरकारच्या भरघोस पाठिंब्यामुळे यावर्षी ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धेचे 130 वे आयोजन हा मोठा उल्लेखनीय कार्यक्रम असणार आहे. ही स्पर्धा म्हणजे फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर फुटबॉल प्रेमींना उत्तम खेळ पाहायला मिळणार आहे. शिवाय कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर आलेली मळभही या स्पर्धेमुळे दूर सारून नवचैतन्य अन नवा उत्साह खेळाडूंना प्राप्त होणार आहे.



काय आहे या स्पर्धेचा इतिहास


ही प्रतिष्ठित स्पर्धा हिमाचल प्रदेशमधील दागशाई येथे 1888 मध्ये सर्वात प्रथम ही भरविण्यात आली आणि भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टीमेर ड्यूरँड यांच्या नावावरून या स्पर्धेचे नामकरण करण्यात आले. ब्रिटीशांच्या सैन्याचे आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्याच्या उद्देशाने सुरुवातीला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असली तरी नंतर ती स्थानिक नागरिकांना खेळण्यासाठी खुली करण्यात आली. सध्या ही स्पर्धा जगातील अनेक प्रमुख स्पर्धांपैकी एक समजली जाते. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात, मोहन बागान आणि पूर्व बंगाल या संघांनी प्रत्येकी 16 वेळा ड्यूरँड चषक जिकल्यामुळे  हे संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ समजले जातात.



असे दिले जातात तीन चषक


या स्पर्धेतील विजेत्या संघाला राष्ट्रपती चषक (सर्वात प्रथम डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला), ड्यूरँड चषक (स्पर्धेतील मूळ बक्षीस- फिरता चषक) आणि शिमला चषक (शिमल्याच्या नागरिकांनी 1903 मध्ये या पारितोषिकाची सुरुवात केली, हा देखील फिरता चषक आहे) असे तीन चषक दिले जातात.


मोहन बागान संघाला पराभूत करून गोकुलम केरळ संघ ठरला विजयी 


या स्पर्धेच्या आयोजनाचे दिल्ली हे पूर्वीचे ठिकाण बदलून 2019 मधील स्पर्धा कोलकाता येथे भरविण्यात आली आणि त्यात अंतिम फेरीत मोहन बागान संघाला 2-1 असे पराभूत करून गोकुलम केरळचा संघ विजयी ठरला. 



भारतीय सैन्यदलांच्या चार संघांसह एकूण सोळा संघात होईल चुरस


या वर्षी 5 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर अशी चार आठवडे कालावधीची ही स्पर्धा कोलकाता येथे भरविण्यात येत आहे. या स्पर्धेतील विविध सामने कोलकाता शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी खेळविले जातील. भारतीय सैन्यदलांच्या चार संघांसह एकूण सोळा संघ या वर्षीच्या स्पर्धेत भाग घेऊन मानाचे चषक मिळविण्यासाठी खेळताना उत्तम स्पर्धात्मकता आणि खऱ्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी सिध्द झाले आहेत.

टिप्पण्या