Azadi ka Amrit Mahotsav: August 15: Maharashtra: ...तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल-उध्दव ठाकरे




मुंबई, दि. १५ : कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपण सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता साथ आटोक्यात असली तरी आपल्याला अजूनही संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. पण तरीही आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ऑक्सीजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे यापुढेही कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.




कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करुया, यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करुया, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले . 



स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालय प्रांगणात आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.




मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्ध्यांची भेट घेतली, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते करत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


राज्यातील  राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचा गौरव आणि अभिनंदन केले.




मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, छत्रपती ‍शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली. परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दाखवूनच नाही दिले तर तसा विश्वास आणि प्रेरणाही आपल्याला दिली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील कुप्रथा, विषमता यांच्या बेड्या तोडल्या. विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.


मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.





मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यात अनेकजण बरे झाले तर काही जणांना दुर्देवाने प्राण गमवावे लागले. या कोरोनाविरांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच साडेनऊ लाख नागरिकांचे लसीकरण करून आपण देशात उच्चांक गाठला आहे, असे त्यांनी सांगितले.


आपल्याला स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. यानिमित्ताने मी माझा देश, राज्य कोरोनापासून मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी उपस्थित पोलीस पथक तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदींना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या