Alpesh Upadhyay suicide case: अल्पेश उपाध्याय आत्महत्या प्रकरणी योगेश अग्रवाल व सुशील दांदळे यांना अटक: आरोपींना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी; एक आरोपी फरार

Yogesh Agarwal and Sushil Dandale arrested in Alpesh Upadhyay suicide case: Accused remanded in police custody till August 6;  One accused absconding




अकोला : जुने शहरा मधील शगुन कॅटरर्सचे संचालक यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. अल्पेश अरविंद उपाध्याय असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तिघांच्या नावे सुसाईड नोट लिहुन ठेवली आहे. मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे यात नमूद केले आहे. आता याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




प्राप्त माहितीनुसार शहरातील अल्पेश अरविंद उपाध्याय (वय अंदाजे 34 वर्ष रा. जुने शहर) शगुन कॅटरर्स नावाने व्यवसाय चालवत होते. यादरम्यान कोरोना काळात आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले गेले, असे प्राथमिक पाहणी वरून म्हंटले  होते. 



घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक माहितीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र,अधिक तपास केला असता मृतकाने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली. योगेश अग्रवाल (अंदाजे वय 40 रा. व्हीएचबी कॉलनी गौरक्षण रोड), सुशील दांदळे (अंदाजे वय 32 रा. गजानन नगर डाबकी रोड), तर फरार आरोपी विशाल पुरोहित या तीन नावाचा उल्लेख केला आहे. कोरोनाच्या काळात तिघांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे उपाध्याय यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. 




याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी हर्षल ओमप्रकाश शर्मा (रा. हरिहर पेठ) यांच्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात भा.दं.वि. कलम 306, 34 नुसार गुन्हे दाखल केले. यामध्ये पोलिसांनी आरोपी योगेश अग्रवाल, सुशील दांदळे यांना अटक केली तर विशाल पुरोहित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय लवंगळे, पीएसआय गणेश सूर्यवंशी, अनिल खाडेकर, विजय बासुंदे, मयूर निखाडे, अर्जुन खंडारे, दंदी आदींनी केली. 



या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शिवसेना या मोठ्या राजकीय पक्षाशी निकट संबंध असल्याचे कळते. हे प्रकरण केवळ व्यावसायिक स्पर्धेतून किंवा आर्थिक व्यवहारातून घडले आहे की यावर काही राजकीय रंग चढलेला आहे, याबाबत उलट सुलट चर्चांना शहरातील व्यापारी आणि राजकीय वर्तुळात उत आला आहे.



  

 



टिप्पण्या