75th Independence Day: स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करणार- पालकमंत्री बच्चू कडू यांची घोषणा; शिवाजी भोसले व सानिका जुमळे युवा पुरस्काराने सन्मानित

75th Independence Day to be celebrated in the district as 'Service Year' - Guardian Minister Bachchu Kadu announces;  Shivaji Bhosale and Sanika Jumle honored with Youth Award




अकोला: भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल,अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केली.  जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवारी ना. बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.


उपस्थित मान्यवर


या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,  विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री तसेच  सर्व सदस्य व सर्व यंत्रणा प्रमुख , माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष कोरपे,  तसेच स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते  ध्वजारोहण करुन पोलीस वाद्यवृंदाने वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या  धुनवर राष्ट्रध्वज वंदना करण्यात आली.


स्वातंत्र्य सैनिक व शहिदांचे स्मरण


त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या संरक्षाणासाठी प्राणांचे बलिदान देणारे सिमेवरील जवान, शहीद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.


तिसऱ्या लाटेसाठी सज्जता


यावेळी ते म्हणाले की,  कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या  आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी चांगले काम केले. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठी जोखीम होती, मात्र गेल्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक ऑक्सिजन पुरवठ्याबाबत परिपूर्णता करुन कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहे. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये अशी प्रार्थनाही आपण करु,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


आगामी वर्ष ‘सेवा वर्ष’


ते पुढे म्हणाले की, आपण सारेजण तिरंग्याचे पाईक आहोत. राष्ट्र प्रथम या विचारातून आपण कार्यरत राहू. स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात   ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करु. जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतांनाच सामान्य माणसांच्या हिताचे विषय अजेंड्यावर घेऊन मार्गी लावण्यासाठी आपण व आपले प्रशासन कार्य करेल. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकुल’ हा प्रकल्प कार्यान्वित करु. अनाथांनाही हक्काचे घर देणार. सामान्य नागरीकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविणार. देशाचा नागरिक हा बलशाली असावा तसेच तो नागरिक  तक्रारमुक्त, चिंतामुक्त  व आरोग्य युक्त असावा यासाठी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहिल,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.


विविध पुरस्कारांचे वितरण


कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा युवा पुरस्कार सन २०१९-२० जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- शिवाजी सुखदेव भोसले, एस.बी.आय.कॉलनी न.३, गजानन पेठ, अकोला. जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.सानिका दशरथ जुमळे, मु.पो.रा. लक्ष्मी नगर मोठी उमरी, जि.अकोला


जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- संत कबीर क्रीडा, शिक्षण व बहूउद्देशिय संस्था, कानशिवणी,  ता. जि. अकोला.जिल्हा युवा पुरस्कार सन २०२०-२१- जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- श्री रोहन पन्नालाल बुंदेले,अकबर प्लॉट किसान चौक, अकोला, जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.वैष्णवी श्यामराव गोतमारे,पहिली लाईन, तापडिया नगर, अकोला. जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण, पातुर ता.पातूर, जि.अकोला यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच ड्रोनद्वारे गावठाण जमाबंदी प्रकल्पाअंतर्गत  अंतिम झालेल्या ५२ गावांपैकी गाजीपूर व वाघजळी या दोन गावांचे मालमत्ता पत्रक प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे उत्कृष्ट कार्य केलेल्या मुर्तिजापूर तालुका, राज्य पुरस्कृत आवास योजना उत्कृष्ट पुरस्कार पातूर तालुका,  उत्कृष्ट ग्रामपंचायत मधापुरी ता. मुर्तिजापूर , राज्य पुरस्कृत  आवास  योजना उत्कृष्ट ग्रामपंचायत  अंधारसांगवी  ता. पातूर,  कृषी विभागांतर्गत फळबाग लागवड व अन्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत व मिलिंद वानखडे, सुशांत शिंदे, मनोज सारभुकन, इश्वर बैरागी त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.


कार्यकमाचे सूत्रसंचालन शेखर गाडगे यांनी केले. या सोहळ्याचे जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांनी फेसबुक पेजवरुन थेट प्रसारण केले.

टिप्पण्या