online fraud loans: ऑनलाईन कर्ज देत लोकांची आर्थिक फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात;बिहार मधून केली अटक

A traitor who cheats people financially by giving loans online has been caught by the police (file image)




उस्मानाबाद : रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार डिसेंबर 2020 मध्ये घडला होता. या प्रकरणात उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन उस्मानाबाद सायबर पोलिसांनी आरोपीच्या बिहार राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत. उस्मानाबाद सायबर पोलिसांनी आरोपीचा बिहारमध्ये 7 दिवस राहून शोध घेतला. अखेर आरोपीला अटक करून मंगळवार 20 जुलै रोजी उस्मानाबाद येथे आणण्यात आले. या आंतरराज्य कारवाई बाबत उस्मानाबाद पोलिसांचे कौतूक होत आहे.



राहुल कुमार लखन प्रसाद लहेरी (वय- 21 रा. भागलपुर, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद नामदेव सिरसाठ  (रा. सकनेवाडी, ता. उस्मानाबाद) यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान कलम 66 (सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांनी करुन आरोपीला अटक केली.




अशी घडली घटना


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद शिरसाठ यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मी रिलायन्स फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक बोलत असून तुम्हाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले असल्याचे सांगितले. तसेच सिरसाठ यांच्याकडून या कर्ज प्रक्रियेसाठी 30,229 रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. सिरसाठ यांनी त्या व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्या पैसे जमा केले. परंतु कर्जाची रक्कम मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सिरसाठ यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली.




या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत होते. सायबर पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या तसेच बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी हा गुन्हा राहुल लहेरी याने केल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीचा सात दिवस शोध घेऊन त्याला अटक केली. यानंतर आरोपीला मंगळवार 20 जुलै रोजी उस्मानबाद येथे आणले.




ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राज रोशन तिलक यांच्या मार्गदशनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुळकर्णी, पोलीस नाईक संजय हालसे, राहुल नाईकवाडी, गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आकाश तिळगुळे, मकसुद काझी, अनिल भोसले, सुनिल मोरे, गणेश हजारे, विमल पौळ, नलावडे, अपेक्षा खांडेकर यांनी आरोपीच्या मोबाईल आणि बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तर पोलीस उपनिरीक्षक अनिल टोंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खैरे, बळीराम घुगे यांच्या पथकाने बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेवून अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करण्याआधी संबंधित कंपनी, बँक, संस्था अधिकृत आहेत का याची खातरजमा करावी. ऑनलाईन फसवणूक झाल्यास लगेच आपल्या बँकशी संपर्क साधून याबाबत माहिती द्यावी. तसेच नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





टिप्पण्या