Murder case: माणुसकीला काळिमा फासणारी घटना: प्रेमप्रकरणातून दोन युवकांची हत्या; मुलगी गंभीर जखमी, मुलीचे कुटुंब पोलिसांच्या ताब्यात

                                     file image





पुणे:  जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण जवळील करंजविहिरे येथे प्रेमप्रकरणातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या दोन युवकांची हत्या झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या प्रकरणातील एक युवती गंभीर जखमी असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. हे दुहेरी कांड मुलीच्या कुटुंबातील व त्यांच्याशी संबंधित सहा जणांनी केले असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. हल्लेखोरांमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक असलेल्या मुलीच्या वडिलांसह सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे चाकण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




बाळू सिताराम गावडे (वय २६) व राहुल दत्तात्रय गावडे ( वय २८) अशी खून झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी करंजविहीरे येथील प्रसिद्ध 'माणुसकी' या हॉटेलचे मालक बाळू मरगज यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्रकरा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (सर्व जण रा. करंजविहिरे ता. खेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार करंजविहिरे येथे हॉटेल माणुसकी हे प्रसिद्ध हॉटेल आहे. हॉटेल मालक बाळू मरगज यांच्या मालकीचे हे हॉटेल असून हॉटेलच्यासमोर मरगज यांचीच मोठी वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणारा कामगार बाळू सिताराम गावडे याने हॉटेल मालक यांच्या २१ वर्षीय मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत याच वीटभट्टीवर काम करणारा राहुल दत्तात्रय गावडे हा देखील होता.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल मालक बाळू मरगज यांनी मुलगी व तिला पळून नेणारे बाळू, राहुल  यांना पकडून आणून हॉटेल माणुसकी या ठिकाणी लाकडी काठी, लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली, यात बाळू व राहुल मयत झाले आहेत.तर मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.


या घटनेमुळे करंजविहिरे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.त्यामुळे  चाकण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.


या घटनेत ठार झालेले वीटभट्टीवर काम करणारे दोघेही तरुण आदिवासी ठाकर समाजातील असल्याची माहिती आता समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहचले. घटनास्थळी पंचनामा केला. ही घटना म्हणजे ऑनर किलींग चा प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे  आहे. तपासाचा हाच धागा पकडून पोलिसांनी या हत्याकांडाचा पुढील तपास सुरू केला असल्याचे कळते.


टिप्पण्या