IAS Transfer: Akola: अदला-बदलीचे राजकारण: जितेंद्र पापळकर यांचा मनपा आयुक्तपदाला स्पष्ट नकार; नीमा अरोरा आज किंवा उद्या पदभार स्विकारणार!





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : श्रेणीनिहाय ड वर्गात येत असलेल्या अकोला मनपा आयुक्तपदावर बदली केल्याच्या आदेशानंतर १३ जुलैला रात्रीच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुबंईसाठी रवाना झाले. बुधवार १४ जुलैला वरिष्ठ अधिकारी व संबंधिताची भेट घेत अकोला मनपा आयुक्तपदाचा पदभार घेण्यास पापळकर यांनी स्पष्ट नकार दिला असल्याचे कळते. तर अकोला मनपा आयुक्त सोडून इतरत्र नियुक्ती मान्य असल्याचे पापळकर यांनी वरिष्ठ अधिका-यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.




अकोला महानगरपालिका ‘ड’ श्रेणीत मोडते. पापळकर यांची जिल्हाधिकारी पदावरून मनपा आयुक्तपदी बदली केली, ही नियुक्ती त्यांना मान्य नसल्याचे कळते.  जिल्हाधिकारी मुंबईत असल्याने निमा अरोरा जिल्हाधिकारी पदाचे सूत्र काल स्वीकारू शकल्या नाहीत. जिल्हाधिकारी पापळकर अकोल्यात आल्यानंतर आज किंवा उद्या नीमा अरोरा जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. जर आयुक्तपदाचा पदभार पापळकर यांनी घेतला नाही तर हा पदभार देखील अरोरा यांच्याकडे राहण्याची दाट शक्यता आहे. 



महाबीजचे MD पदाला लागली नाट

 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज  या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावर नेमले जाणारे हे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असतात. मात्र हे अधिकारी येथे येण्यास इच्छुक नसतात. महाबीजच्या MD पदाला जणू काही नाटच लागली असल्याचे चित्र आहे. कारण येथे एकही अधिकारी सेवा देवू इच्छित नाही. पदभार घेतल्यानंतर अधिकारी लगेच दुसरीकडे बदली करून घेतात, हे आजवर स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, महाबीजचे एमडी पद रिक्त झाले असल्याने या पदावर पापळकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुपकुमार यांची २००३ मधे महाबीज एमडी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी लगेच एमडीचा पदभार स्वीकारत दोन वर्षाचा कार्यकाळ सुध्दा पुर्ण केला होता. त्यानंतर जी. श्रीकांत यांचीही बदली महाबीज एमडी पदावर केली होती. परंतु बरीच दिवस टाळाटाळ केल्यानंतर पदभार घेत जी. श्रीकांत यांनी काही दिवसातच परभणी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करून घेतली होती.




आता तीन महिन्यांपूर्वी आलेले डॉ. राहुल रेखावार यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्याआधी डिसेंबर 2020 मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 17 फेब्रुवारीला महाबीज मुख्यालय गाठून कामकाजाचा आढावा घेतला. परंतू अवघ्या आठवडाभरातच त्यांची नियुक्ती औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात करण्यात आली. त्यांच्या जागेवर डॉ. राहुल रेखावार यांची नियुक्ती केली गेली. 9 एप्रिलला राहुल रेखावार यांनी पदभार स्वीकारला. मात्र रेखावार यांची या पदावर राहण्याची इच्छा नाही, अशी चर्चा महामंडळाच्या मुख्यालयातील आतील गोटात सुरू होती.




पहिल्यांदा असे घडले


अकोला जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनाने अकोला महापालिका आयुक्त निमा अरोरा यांची नियुक्ती केली आहे. तर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने इतर ही जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्‍यांची बदली केली आहे. मात्र, अकोल्यात जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्यात झालेली हा बदली प्रकार प्रशासकीय क्षेत्रात पहिल्यांदाच झाला असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. या अदलीला बदली प्रकार बाबत प्रशासकीय क्षेत्रा सोबतच सामाजिक राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर हा प्रकार करण्यामागे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्यापर्यंत चर्चा झाल्या. स्थानिक नेत्यांची नाराजगी ओढवून घेतल्यामुळे हा डाव खेळल्या गेला असल्याची चर्चा काल शहरात रंगली होती. नीमा अरोरा आणि जितेंद्र पापळकर यांनी आता पदभार स्वीकारल्या नंतरचं या उधाण आलेल्या चर्चांना विराम मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित


टिप्पण्या