Crime news: kulbhushan patil: जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या



                फोटो सौजन्य:समाज माध्यम



जळगाव: शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली.या घटनेमुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रात्री उशिरा जळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या हल्ल्यामध्ये  कुलभूषण पाटील यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.


  

अशी घडली घटना


काल दुपारी पिंपराळा भागात चार वाजताच्या सुमारास शहरात दोन गटांमध्ये क्रिकेट सामना खेळण्याच्या वादावरून भांडण झाले होते. याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम रामानंद पोलीस स्टेशनला सुरू होते. दरम्यान हे प्रकरण आपसी समझोता करून मिटवावे, यासाठी उपमहापौर त्याठिकाणी आले. मात्र त्यातील एका गटाची उपमहापौर यांच्यावर नाराजी असल्याने त्यातून हा गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. 


दरम्यान, पाटील हे रात्री आपल्या कार्यालयातून अनिल यादव यांच्यासह दुचाकीने घराकडे निघाले असता, हल्लेखोरांनी त्यांच्यावर एक गोळी झाडली. त्यानंतर पाटील घराकडे पळाले. यावेळी मंगलसिंह राजपूत, उमेश राजपूत, महेंद्र राजपूत यांच्यासह बिऱ्हाडे नामक युवकाने तीन गोळ्या झाडल्या. दरम्यान ओरडा झाला आणि  नागरिकही जमा झाल्याने हल्लेखोर पसार झाले, अशी माहिती स्वतः कुलभूषण पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.



दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध व अटकेसाठी ताताडीने पथके  तयार करून रवाना केली आहेत. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



टिप्पण्या