Akola Rain live update: पावसाचा कहर: सर्तकतेचा इशारा: जिल्ह्यात 2237 घरांची पडझड: 6200 हेक्टर पिकांचे नुकसान; 153 जनावरांचे मृत्यू, एक व्यक्ती बेपत्ता, पालकमंत्री कडू उद्या अकोल्यात




नीलिमा शिंगणे- जगड

अकोला:  मागील 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात व तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 13 पथकाव्दारे  पंचनामा करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाज नुसार,  27 जुलै पर्यंतच्या कालावधीत अकोल्यात मुसळधार पावसाची श्यक्यता आहे. दरम्यान पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या 23 जुलै रोजी पालकमंत्री बच्चू कडू अकोल्यात येणार आहेत.



रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, निलेश अपार, विश्वनाथ घुगे, तहसिलदार अरकराव आदी उपस्थित होते.


45 वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहुन गेले


गेल्या 24 तासामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोट तालुक्यातील पनोरी येथील 45 वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहुन गेले असुन त्यांचे शोध कार्य सुरु आहे. तसेच जिल्ह्यात 2237 घरांचे नुकसान झाले असून 6200 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर 153 जनावरांचे मृत्यू झाले असल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.



पुरात अडकलेल्याना सुरक्षित स्थळी आणले

अकोला शहरातील मोर्णा नदीच्या पुरामुळे अडकलेल्या 40 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तर उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच तालुक्यातील पुरामुळे अडकलेल्या 26 लोकांना स्थानिक शोध व बचाव पथकाने सुरक्षित बचावकार्य केले. अतिवृष्टीचा पंचनामा करण्याकरीता तलाठी, ग्रामसेवक व मनपा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाव्दारे सर्वेक्षण करण्यात येणार असून अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा तात्काळ सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिलेत. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर येथील एसडीआरएफ पथक व स्थानिक आपत्ती पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.



सर्तकतेचा इशारा

हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार ( 27 जुलै) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.


दगडपारवा प्रकल्प पूर नियंत्रण  कक्षाच्या माहितीनुसार, गुरुवार 22 रोजी सकाळी 11 वाजता दगडपारवा प्रकल्पाचे एक वक्रव्दारे प्रत्येकी 2.50 सेमी उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण 2.05 घ.मी./से. एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पुर्णा बॅरेज-2(नेरधामणा) बॅरेकची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहे. पूर पातळी 243.50 मी.असून 12 गेट मधुन पूराचे पाणी वाहत आहे. पूर विसर्ग 4672.92 घमीप्रसे आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत निर्णय घेण्यात येईल. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेवून  सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.


नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असताना व पूर परिस्थिती असताना पूर पाहण्यास गर्दी करुन नये. पुलावरुन पाणी  वाहत असतांना दुचाकीने किवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपले मुख्यालयी उपस्थितीत राहुन सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी दिले आहेत.



पालकमंत्री बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार  23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-


शुक्रवार 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व सकाळी 10 वा. 5 मि. नी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जिल्ह्यात उद्धभवलेली पुर परिस्थितीबाबत आढावा बैठक, सकाळी 11 वा. 5 मि.नी अकोला शहर, कौलखेड, खडकी व चांदुर ता.जि. अकोला येथील पुर परिस्थितीबाबत पाहणी. दुपारी 12 वा. 5 मि.नी बार्शिटाकळी तालुक्यातील पुर परिस्थितीबाबत पाहणी व सवडीने कुरळपुर्णा मार्गे, जि. अमरावती कडे प्रयाण.

टिप्पण्या