Agriculture University:Vidarbha विदर्भातील 1168 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात; कृषी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचा ठिय्या, आमदार सावरकरांनी उचलून धरली बाजू





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कृषीतंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विदर्भातील 1168 विद्यार्थ्यां समोर कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणा-या महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजयुमोच्या वतीने आज विद्यार्थ्यांसह डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्रात आंदोलन उभे राहील. त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी दिला आहे.


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत या वर्षात 1168 विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रानिकेतांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांना बी.एस.सी कृषी  पदवी अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षात दिल्या जाणा-या प्रवेशाला विद्यापीठाने नकार दिला. यामध्ये विदर्भातील 1168 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने कृषी आंदोलन उभारले.



आमदार सावरकरांनी उचलून धरली बाजू


आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेवून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याशी संपर्क साधला. आंदोलक विद्यार्थी व भाजयुमोचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आ सावरकर यांनी डॉ. भाले यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित ठेऊ नये, असा स्पष्ट इशारा आमदार सावरकर यांनी यावेळी दिला.


राज्यातील कृषी विद्यापिठ शिवाय इतर शैक्षणिक विद्यापीठ मध्ये कोविड 19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आली असतांना कृषी विद्यापीठ सोबत आघाडी शासनाने असा दुजाभाव करता कामा नये. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात शासनाने तातडीने सवलत देण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. भाले यांना सावरकर यांनी दिल्या आहे. 



विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला वेळ नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यात खेळण्याचा महापाप महाविकास आघाडी करीत असून सरकारला वसुली या विषयात रस आहे. परंतु विद्यार्थी, शेतकरी, बारा बलुतेदार अठरापगड जाती यांच्या समस्या सोडवण्यात सरकारला रस नसल्याचा आरोप आमदार रणधीर सावरकरांनी यावेळी केला.



विद्यार्थीच्या प्रवेश बाबतचा निर्णय राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी 16 जून 2021 रोजी घेतला असल्याचे चर्चेदरम्यान समजले. परंतु सदरचा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिषदेस अद्याप पर्यंत कळविण्यात आला नसल्याने आ. सावरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिषदेस तातडीने कळविण्यात येऊन १५ दिवसाचे आत विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचा निर्णय घ्यावा, असे सावरकर यांनी यावेळी कुलगुरूंना सूचित केले.



विद्यार्थ्यांचा प्रश्न भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी उचलला असून यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून आज आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात या विषयाला भाजयुमोने वाचा फोडली आहे. या आंदोलनात अंबादास उमाळे, जयंत मसने, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, किरण अवताडे, अभिजित बांगर, निलेश काकड, अमोल पिंपळे, सुयोग देशमुख, उज्वल बामनेट, अक्षय जोशी, राजेश निनाळे, हमेंद्र सुनारीवाल आदींनी सहभाग घेतला.


राज्यात एकूण 6420 विद्यार्थी



राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम पूर्ण करणारे जवळपास 6420 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. राज्यसरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.







टिप्पण्या