Shivsena:BJP: Akola: सत्ताधारी भाजपवर शिवसेना स्टाईल चिखलफेक: नालेसफाईचा मुद्दा ऐन पावसाळ्यात पुन्हा पेटला




 

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शहरात मान्सूनपूर्व छोटे-मोठे नाले- नाली साफ सफाईकडे सत्ताधारी भाजप पक्षाने मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे ८ जून रोजी रात्री बरसलेल्या मुसळधार पावसाचे पाणी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांत शिरले. नागरिकांना संपूर्ण रात्र घरात घुसलेले घाण सांडपाणी बाहेर फेकावे लागले. सत्तापक्षाला या बाबतीत जाणीव व्हावी, यासाठी महापौर अर्चना मसने यांच्या दालनासमोर व मनपा प्रवेशद्वारवर शिवसैनिकांनी नाल्यांमधील घाण सांडपाणी व चिखल फेकत 'शिवसेना स्टाईल' उग्र आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी महापौर मसने यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी यावेळी केली.





शिवसेनेच्या या आंदोलनाने नालेसफाईचा मुद्दा ऐन पावसाळ्यात पुन्हा पेटला आहे. शहरातील सर्वच छोट्या मोठे नाले प्लास्टिक पिशव्यांचा कचरा व घाणीने तुडुंब साचलेले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, याची नैतिक जबाबदारी सत्ताधारी भाजपची असल्याची टीका करीत शिवसेना शहरप्रमुख तथा मनपा गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिकेत शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात आले. बादलीमध्ये नाल्यामधील घाण सांडपाणी व चिखल आणत तो महापौरांच्या दालनासमोर फेकत भाजपच्या धोरणांचा निषेध शिवसैनिकांनी व्यक्त केला. 'अकोलेकर त्रस्त... सत्ताधारी मस्त... महापौर सुस्त...' अश्या गगन भेदी घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.




शहरप्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, नगरसेविका मंजूषा शेळके, शरद तुरकर आदींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. 




नालेसफाईच्या मुद्यावर सत्तापक्षासह प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत ही समस्या त्वरित निकाली न काढल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याची चेतावणी यावेळी राजेश मिश्रा यांनी दिली.


टिप्पण्या