political:congress:nana patole: आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने मीच जाहीर करेन- नाना पटोले यांचे वक्तव्य; नाना भाऊंनी केली पदाधिकाऱ्यांची कानउघडणी





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने मीच जाहीर करीन, आमची भूमिका आमचाच पक्ष ठरवेल. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत चर्चा सुरुच असतात. आम्ही मात्र स्वबळावरच निवडणूक लढविण्याची तयारी करत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असल्याचे  काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.



पटोले सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते अकोल्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी २०२४ मध्ये  'महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार' असल्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत प्रश्न उपस्थित झाला असता, त्यांनी पत्रकार परिषदेत स्वबळाचा पुनर्उच्चार केला. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने सत्ता मिळविण्याच्या तयारीत असल्याचे म्हणाले.







भाजपला रोखण्यासाठी व धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी  ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी पटोले यांनी दर्शविली.





स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द झाले. या प्रकारला केवळ केंद्राचे भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला. मागास आयोग स्थापन करण्यात राज्य सरकारची चालढकल आणि सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची संख्या सादर करण्याला केंद्राला आलेले अपयश आले, यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.


आगामी २०२४ ची निवडणूक डोळ्या समोर ठेवून काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केली जात आहे. अकोला जिल्हा व महानगर काँग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील,असे सांगून अकोल्यातील काँग्रेस पक्षात दमदार नेते आहेत; मात्र समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवते. येणाऱ्या काळात सर्व चुका दुरुस्त करून नव्याने फेरबदल जातील, अशी स्पष्ट भूमिका पटोले यांनी मांडली. काँग्रेसच्या प्रेमापोटी पत्रकारांनी देखील वस्तुस्थिती निदर्शनात आणून दिली, असा उच्चार करीत यासाठी पत्रकारांचे आभार देखील पटोले यांनी यावेळी मानले.




पक्ष संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर कोरोनाचे संकट कायमच होते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जाता आले नाही, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन संघटनेची बांधणी करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.




केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा अत्यल्प आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असतानाही दुसरीकडे हमीभाव मात्र ५ टक्केही वाढविलेले नाहीत. वास्तविक दरवर्षी किमान १० टक्के दरवाढ अपेक्षित असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला.



यावेळी महिला व बालविकासमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी मंत्री अझहर हुसेन, माजी आमदार नितकोद्दीन खतीब, मनपा गटनेते साजीद खान पठाण, डॉ. सुधीर ढोणे, प्रकाश तायडे, मदन भरगड, प्रदीप वखारिया आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. संचालन कपिल रावदेव यांनी केले.



कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी बळकावल्या खुर्च्या


कोविड नियमानुसार मोजके पदाधिकारी पत्रकार परिषदेत आमंत्रित केले होते. मात्र,स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटी साठी आणि समोर समोर मिरविण्यासाठी ऐनवेळी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दी केली. नियोजन शून्य या पत्रकार परिषदेत पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या खुर्च्यां कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी बळकावल्या.  




नाना भाऊंनी केली कानउघडणी



प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर त्यांचा अकोल्यातील वेळ कसा नियोजित करायचा,अकोला विकासाचे मुद्दे, पक्ष मजबुती यासाठी बैठक घेऊन विचार मंथन करण्याऐवजी कोणाच्या घरी चहा घ्याचा,कोणाच्या घरी जेवण करायचे, कोणाकडे सदिच्छा भेट द्यायची याबाबतच चर्चा झाली होती, असे कळते. 


शुक्रवारी नानांची एका पदाधिकारीकडे झालेल्या चहापान बैठकीत (महत्वपूर्ण!) जिल्हाध्यक्षचे कुणी ऐकत नाही, अशी उघड चर्चा झाली. यासमोर जेष्ठ कनिष्ठ, आजी माजी वाद न ठेवता पक्ष मजबुती साठी एकत्र यावे, अन्यथा पक्षश्रेष्ठीच्या कारवाईला सामोरे जा, अश्या कडक शब्दात नाना भाऊंनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली असल्याचे समजते.  


एका पदाधिकाऱ्याकडे भेटीचा कार्यक्रम नियोजित नव्हता. मात्र, त्यांनी थेट नानांना आमंत्रण देऊन मला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तक्रार स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सर्वासमक्ष केली. त्यानंतर नानांनी त्या पदाधिकारीची नाराजी दूर होण्यासाठी त्यांच्याकडे देखील भेट देत आदरातिथ्याची यादी ऐनवेळी वाढविली.




नानांचा पाचवा दिवसाचा विदर्भ दौरा हा दोन नेत्यांच्या घरी आदरातिथ्य स्वीकारून संपला. गुरुवारी रात्री एका नेत्यांकडे सुरू झालेला हा दौरा. शुक्रवारी सकाळी जनता बाजारात एक सत्कार कार्यक्रम नंतर पत्रकारांशी संवाद. त्यानंतर पुन्हा एका नेत्यांच्या घरी. दरम्यान, औपचारिक कोविड सेंटर भेट, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा, कोविड काळात लोकांची मदत केलेल्या कार्यकर्त्यांची प्रशंसा, भेटीगाठी, सेल्फी फोटो सेशन अश्यात संपला. 






टिप्पण्या