Indian Boxer: इंडियन बॉक्सर डिंगको सिंह यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या शोक संवेदना




नवी दिल्ली: एशियन गेम्स सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंगको सिंह यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. २०१७ पासून त्यांच्यावर यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती, मात्र त्यांनी या विषाणूवर मात केली होती. काही दिवसांपासून सिंह यांच्यावर आय एल बी एस, दिल्ली येथे उपचार सुरू होते.





गेल्या वर्षी त्यांना तब्येत बिघडल्याने मणिपूरहून खास विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले होते. मात्र कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णवाहिकेतून २४०० किमी लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले होते.



दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुष्टियोध्दा  डिंगको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


 


आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “श्री. डिंगको सिंह एक खिलाडू वृत्तीचे  महानायक, एक उत्कृष्ट मुष्टियोध्दा होते, ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवले तसेच बॉक्सिंग या खेळाची लोकप्रियता वाढविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मला दु: ख झाले आहे. त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांप्रती मी सहानुभूती व्यक्त करत आहे,ओम शांती. ”


भारतीय क्रीडा विश्वातील चमकता तारा निखळला असल्याच्या संवेदना क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.डिंगको सिंह नवोदित बॉक्सरांकरिता प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.




टिप्पण्या