Heavy rain: Akola:सतर्कतेचा इशारा: अकोल्यात सायंकाळ पासून बरसला धुवाधार पाऊस; नैसर्गिक आपत्तीसाठी प्रशासन सज्ज, 77 पुरबाधित गावे निश्चित





अकोला: हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार, जिल्ह्यामध्ये वीज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान प्रती तास 30 ते 40 कि.मी. या प्रमाणे वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेतली आहे. सध्या अकोल्यात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत असला तरी, येत्या काळात होणाऱ्या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, आज सायंकाळ पासून धुवाधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे.





नैसर्गिक आपत्तीला प्रशासन सज्ज


आगामी मान्सूनच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्यात आली असून नैसर्गिक आपत्तीला प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी माहिती दिली. वारंवार पुरबाधित गावे निश्चित करण्यात आली असून अकोला जिल्ह्यात 77 पुरबाधित गावे आहे. त्यापैकी अकोला येथे 12, बार्शीटाकळी येथे 12, अकोट येथे 10, तेल्हारा येथे 11, बाळापूर येथील आठ, पातूर येथे 10 व मुर्तिजापूर येथे 14 याप्रमाणे तालुका निहाय पुरामुळे बाधित होणारी गावे आहेत.





भारतीय मौसम विभाग पुणे व नागपूर यांचे कडून प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती संबंधीचे संदेश स्थानिक स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीकडे तातडीने पोहोचविण्यात येतात व त्यानुसार महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर आपत्ती संबंधित नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 77 पूरप्रवण गावामध्ये स्थलांतराची आवश्यकता निर्माण झाल्यास 77 पूरप्रवण गावामध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.  तसेच अकोला शहरातील 33 ठिकाणे, अकोट शहरातील 10 ठिकाणे, बाळापूर शहरातील पाच ठिकाणे पुरबाधित लोकांच्या स्थलांतराच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आली आहे.




शोध व बचाव पथक

शोध व बचावाच्या अनुषंगाने अकोट व अकोला येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन रबर बोटी उपलब्ध आहेत. यासह लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप 400 मी., इमरजन्सी लाईट इ. शोध व बचाव साहित्य उपलब्ध आहे.  तसेच प्रत्येक तालुकास्तरावर महसुल कर्मचारी, होमगार्ड, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांचे पथक उपलब्ध  आहे. आवश्यकतेनुसार एनडीआरएफ पुणे व एसडीआरएफ नागपूर यांची मदत उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. शोध कार्य दरम्यान शोध व बचाव पथकाला निवासाची आवश्यकता भासल्यास त्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावरील 10 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. वादळीवारा, अवकाळी पाऊस, वीज पडणे, गारपीट, पुरस्थितीच्या अनुषंगाने वेळोवेळी प्राप्त सुचनेनुसार नागरिकांनी दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात  येत आहे.


टिप्पण्या