Facebook fake account: राजस्थान येथे धागेदोरे: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट; माजी महापौरांचे पुत्र आणि जेष्ठ पत्रकार यांना पैश्याची मागणी





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे बनावट (Fake)  फेसबुक अकाऊंट तयार करून एका इसमाने अकोल्यातील अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून,मित्र बनविले. यानंतर लोकांना मदतीची गरज असल्याचे सांगून पैश्याची मागणी केली. माजी महापौर यांचा मुलगा अखिलेश हातवळणे आणि जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष गादिया यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, सायबर क्राईम पोलीस ब्रांच तपास कार्यास लागली आहे. सदर अकाउंट बाडमेर (राजस्थान) येथील असल्याचे कळते. 




माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे याच्या सोबत  बनावट फेसबुक अकाउंट वरून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावावर हा प्रकार घडला आहे. या संदर्भात अखिलेश हातवळणे याने जिल्हाधिकारी यांना माहिती दिली असून,अकोला पोलिस यंत्रणा या संदर्भात चौकशी करीत आहे. तसेच हा प्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष सुभाष गादिया यांच्या सोबत देखील घडला आहे आहे. अकोल्यातील प्रतिष्ठित नागरिकांना या इसमाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली असून, जवळपास 12 ते 13 लोकांना पैश्याची मागणी केली आहे. सदर अकाउंट पाकिस्तान बॉर्डर जवळील राजस्थान येथील बाडमेर गावातील असल्याचे समजते. लवकरच या इसमाचा खरा चेहरा समोर येणार असल्याचे पोलीस यंत्रणेच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.




असा उघड झाला हा प्रकार



प्राप्त माहिती नुसार, सदर इसमाने प्रा. गादिया आणि अखिलेशला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने मेसेंजरवर एक मेसेज पाठविला की, "मला आपल्याशी अर्जंट काम आहे". यानंतर गादिया  यांनी उत्तर दिले की, भेटायला येऊ की फोन करु. यावर त्याने मेसेज पाठविला की," मी दवाखान्यात भरती आहे आणि येथे फोन लावणे अलाऊ नाही", हे  वाचल्यानंतर गादीया यांच्या लक्षात आले की, हा हॅकर आहे. त्याला थेट विचारले पैसे पाठवू  का?, यावर तो म्हणाला पाठवा. 12 हजार रुपयेची त्याने मागणी केली.  अकाऊंट नंबर विचारला असता त्याने  गुगल पे चा नंबर पाठविला. हा संपूर्ण प्रकार गादिया आणि अखिलेशने जिल्हाधिकारी पापळकर यांना त्वरित सांगितला.



आपले फेक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले असल्याचे  पापळकर यांना  माहीत होताच, त्यांनी सायबर सेलला कळविले. सध्या पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत. नागरिकांनी अश्या प्रकारापासून वेळीच सावध होवून, होणारी फसवणूक टाळावी,असे आवाहन जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


टिप्पण्या