- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अमरावती: शिवसेना तिवसा शहरप्रमुख असलेल्या अमोल पाटील याची डोळ्यात मिरची पूड टाकून शनिवारी रात्री निघृण हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बार समोर ही घटना शनिवारी (26 जून) रात्री घडली. रात्री साडे दहा अकराच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने 34 वर्षीय अमोल पाटील याच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन हत्या केली. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बारमध्ये शनिवारी रात्री साडेदहा अकरा वाजताच्या सुमारास अमोल पाटील त्याच्या मित्रासोबत बारमध्ये आला होता. मात्र वाइन बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर दारू पीत बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून पाच जणांनी अमोल पाटील याच्यावर हल्ला केला. डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याला जागीच ठार केले.
या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून रात्री उशिरा चार जणांना अटक केली. तर एक आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्याचे आरोप आहेत. दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी अमोल पाटीलच्या नावे तडीपारचा आदेश काढला होता. अमोल पाटील गुंडप्रवृत्तीचा होता. त्यामुळे अनेकांशी त्याचे वैर होते. जुन्या वैमनस्यामुळे व अवैध व्यवहारातून वचपा काढण्यासाठी अथवा राजकीय चढाओढीने ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, लवकरच या गुन्ह्या मागील सत्य समोर येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा