Crime news: BJP: Navi Mumbai: भाजपचे खंदे समर्थक संदीप म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला; एक मारेकरी पोलिसांच्या ताब्यात





नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक व भाजपाच्या नगरसेविका संगिता म्हात्रे यांच्या पतीवर दोघा हल्लेखोरांनी हल्ला केला. दैवबलवत्तर म्हणून संदीप म्हात्रे या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. मात्र, त्यांच्या खांद्यांवर खोलवर जखम झाली असून वाशी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ही घटना कोपरखैरणे येथील सेक्टर ६ मधील संगीता संदीप म्हात्रे यांच्या कार्यालयात रविवारी रात्री घडली. संदीप म्हात्रे हे सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे स्थानिक पदाधिकारी असून ते संपर्क कार्यालयात असताना दोघे हल्लेखोर आले. मारेकऱ्याच्या हाती कोयते, चाकू व रिव्हाल्व्हरही होती. यातील दोघांनी म्हात्रे यांच्यावर अगदी जवळून कोयत्याने वार केले.



आपल्यावर हल्ला होत असल्याचे संदीप यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच बाजूला होण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांचे वार खांद्यावर बसले. म्हात्रे यांनी आरडाओरडा केल्यावर कार्यालयाबाहेर असलेले लोक जमले. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान यातील एक हल्लेखोर बाहेर जमलेल्या लोकांच्या हाती लागला. लोकांनी एकाला शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडे कोयता, चाकू व रिव्हॉल्व्हर मिळाले आहे. रिव्हॉल्व्हर असतानाही हल्लेखोरांनी त्याचा वापर केला नाही. हल्ल्यामागील कारण राजकीय डावपेच आहे की अजून काही, हे स्पष्ट झालेले नाही. नवी मुंबई पोलीस  घटनेचा अधिक तपास करीत आहेत. घटने प्रसंगी कार्यालयात संगीता म्हात्रे देखील होत्या, असे समजते.




टिप्पण्या