Anil deshmukh:ED Raid: अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरावर इडीचा छापा; राकॉ कार्यकर्ते आक्रमक




नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने आज शुक्रवारी छापा टाकला असून, चौकशी सुरू केली आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थान बाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना (सीआरपीएफ) तैनात आहे. देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुन नागपूर पोलिसांनी कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे.


कार्यकर्त्यांना अटक


देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारीचे वृत्त समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.  देशमुख यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुर येथील घराबाहेर ईडी आणि भाजपा विरोधात जोरदार निदर्शने दिली. कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरुन ठिय्या आंदोलन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात  घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र कार्यकर्ते हटले नाहीत. पोलिसांनी बळाचा वापर करुन निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार यांना देखील पोलिसांनी अटक केली. यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.



दरम्यान, अनिल देशमुख घरी नसून ते मुंबईत असल्याची माहती समोर आली.मात्र, त्यांच्या घराची झाडाझडती व अन्य चौकशी नागपूर ईडी पथक करीत आहेत.सकाळी 8 वाजता पासून कारवाई ला सुरवात झाली आहे.




मुंबईतील घरावर ईडीचा छापा


अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थान पाठोपाठ आता मुंबईतील निवासस्थानी देखील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. सकाळी 8 वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. दरम्यान, अनिल देशमुख सध्या नागपूर आणि मुंबईतही नाहीत ते पुण्यात असल्याचे समोर आले आहे.


मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचे निवासस्थान आहे. याठिकाणी ईडीचे पथक दाखल झाले आहेत.  



मे महिन्यात झाली होती कारवाई

                                     file photo

गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील जप्त केले होते. 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. 25 मे रोजी अनिल देशमुखांशी संबंधित नागपुरातील तिघांकडे ईडीने चौकशी केली होती. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलल्या जात आहे. आजच्या कारवाई मुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण परत एकदा ढवळून निघाले आहे. 




टिप्पण्या